‘रोहयो’ मार्गी लावा
By admin | Published: February 2, 2015 11:01 PM2015-02-02T23:01:32+5:302015-02-02T23:45:27+5:30
अधिकारी, सदस्यांमध्ये एकमत : कणकवली पंचायत समिती मासिक सभा
कणकवली : एमआरईजीएसमधील ६०-४० चे प्रमाण ठेवून कामे करताना अडचणी येत आहेत. देवगड, मालवणमध्ये जशी अॅडजस्टमेंट करण्यात आली तशी करा मग कामे मार्गी लागतील, असा सूर पंचायत समिती सभेत निघाला. एमआरईजीएसची कामे मार्गी लावताना येणाऱ्या अडचणींचा पाढा गटविकास अधिकाऱ्यांनी वाचला. कणकवली पंचायत समितीची मासिक सभा प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात सभापती आस्था सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती भिवा वर्देकर, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, सहाय्यक गटविकास अधिकारी एम.ए.गवंडी उपस्थित होते.
एमआरईजीएसचा लक्ष्यांक साध्य करताना अडथळ्यांचा पाढाच सहाय्यक गटविकास अधिकारी गवंडी यांनी वाचला. आमच्याकडे तांत्रिक मनुष्यबळ नाही. गोठे, विहिरी ही कामे साठ-चाळीसच्या निकषात बसत नाहीत. अधिकारी आपल्या पदभार सांभाळून रोहयोची कामे करतात. प्रत्येक काम आॅनलाईन असून बीएसएनएलकडून इंटरनेटची समस्या निर्माण होत आहे. तरीही तालुक्यात ५२ टक्के काम पूर्ण झाले असून ६७ लाख रूपये खर्च झाले आहेत, असे गवंडी म्हणाले. यावर सदस्य बबन हळदिवे यांनी ग्रामसेवकांचा आढावा घेतला नसल्याबाबत ताशेरे ओढले आणि तुमच्यात काम करायची मानसिकता नसेल तर इतर कामे कशी करतील? असा प्रश्न केला. निकषात कामे तुम्ही बसवा, असा सूर सदस्य सुरेश सावंत यांनी लावला. निकषाचा अडथळा होता तरी आतापर्यंत गोठ्यांची कामे झाली. प्रस्ताव मागवताना निकषाची समस्या सोडवायला हवी, असे भाग्यलक्ष्मी साटम यांनी सांगितले.
गवंडी हे कामे अडवत असल्याचा आरोप सदस्यांमधून झाल्यावर त्यांनी त्याचे उदाहरण सांगा, असा आग्रह धरला. ते म्हणाले की, तालुक्यातून वैयक्तिक स्वरूपाची शौचालये, गोठे, विहिरी अशी कामे जास्त प्रस्ताव येतात. त्यापेक्षा रस्त्यांची साईडपट्टी आदी सार्वजनिक उपयोगाची कामे जास्त आल्यास साठ-चाळीसच्या निकषाचे संतुलन होऊ शकते. निव्वळ मंजुरीचा भाग असलेली कामेच तालुक्यात होत नाहीत. फक्त ११ रस्त्यांची कामे सुरू आहेत.
यानंतर सभापतींनी दखल देत अकुशल कामांचा भाग वाढवल्यास संतुलन होऊ शकते, असे भाग्यलक्ष्मी साटम यांनी सांगितले. सदस्यांनी आम्ही सहकार्य करतो पण अधिकारी आपल्या बाजूने सहकार्य करणार का? देवगड, मालवणमध्ये जशी ‘माणुसकी’ दाखवत कामे मार्गी लावण्यात आली तशी लावणार का? असा प्रश्न केला. या मुद्यावर बराचकाळ चर्चा झाली. तालुक्याला १ कोटी ३० लाखाचा लक्ष्यांक असून मार्चअखेरपर्यंत किती पैसे खर्च करणार? असा प्रश्न सुरेश सावंत यांनी उपस्थित केला. बांधकाम विभागाकडून अद्याप एकदशांश कामे झाली नसल्याचे गवंडी यांनी सांगितले. कृषी, लघुपाटबंधारे, ग्रामपंचायत पाणी पुरवठा, आणि बांधकाम विभागाचे सहकार्य मिळाल्यास निश्चितपणे लक्ष्यांक पूर्ण करता येईल, असे गवंडी यांनी सांगितले. अधिकाऱ्यांकडून काम अडवले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कारवाई केली जावी, असे उपसभापती वर्देकर यांनी सूचना केली. (प्रतिनिधी)
रब्बी शेतीचे नुकसान करणाऱ्या मोकाट गुरांना पायबंद घालणे आवश्यक असल्याची सूचना दादा कर्ले यांनी मांडली. त्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्र देऊन कोंडवाडा निर्माण करण्यासह उपाययोजना करण्याचे पत्र पाठवण्यात यावे तसेच पंधरा दिवसांनी याचा आढावा घेण्याचा ठराव सभापतींच्या सूचनेने घेतला.