शाळेच्या पहिल्याच दिवशी छप्पर कोसळले, सुदैवाने विद्यार्थी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:35 PM2019-06-19T15:35:29+5:302019-06-19T15:37:40+5:30
बिबवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या मोडकळीस आलेल्या छपराची कौले शाळा सुरू असताना कोसळली. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही.
कुडाळ : बिबवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या मोडकळीस आलेल्या छपराची कौले शाळा सुरू असताना कोसळली. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही.
याबाबत समजताच कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. बिबवणे शाळा दुरुस्तीसाठी प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र, जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मंजूर केला नसल्याची माहिती यावेळी सभापती जाधव यांनी दिली. दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला.
बिबवणे येथील प्राथमिक शाळेचे छप्पर मोडकळीस आले असून, छपराची दुरुस्ती करण्यात यावी, याकरिता ग्रामस्थ तसेच शिक्षकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच आवश्यक ते प्रस्तावही दिले. तसेच कुडाळ पंचायत समितीच्यावतीनेही शाळेच्या दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे जानेवारी व मे महिन्यात पाठविला होता. मात्र, शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे शाळेच्या छप्पर दुरुस्तीचे काम प्रलंबित राहिले होते.
सोमवारी सकाळी शाळा सुरू झाल्याने शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आले होते. शाळा सुरू असतानाच सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास या शाळेच्या मोडकळीस आलेल्या छपरावरील काही कौले खाली कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटना समजताच पालकांनी शाळेत गर्दी केली. तसेच बिबवणे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक घटनास्थळी दाखल झाले. कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव व कुडाळचे गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी सभापती जाधव म्हणाले की, बिबवणे शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अग्रक्रमाने पाठवून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले.
तालुक्यात अजूनही बऱ्याच शाळांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही या कामांना मंजुरी मिळाली नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पालक व ग्रामस्थांनीही शाळेच्या छपराची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी केली.