‘ती’च्या हाती विजेची दोरी
By admin | Published: September 3, 2015 11:13 PM2015-09-03T23:13:39+5:302015-09-03T23:13:39+5:30
महावितरण : विद्युत सहाय्यक पदावर २९ महिला
रत्नागिरी : वैज्ञानिक युगात विजेवर चालणारी अत्याधुनिक यंत्रसुविधा उपलब्ध आहे. विजेच्या यंत्रसुविधेमुळे अवघड काम सहज शक्य होते. मात्र, त्याचवेळी एखादा बिघाड झाला तर बिघाड दूर करणे अवघड काम. कारण विजेच्या बाबतीत ‘दया, माया, क्षमा शांती’ याला थारा नाही. परंतु आता या क्षेत्रात महिलांनीदेखील आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात पुरूष जनमित्रांच्या खांद्याला खांदा लावून २९ वायरवुमन कार्यरत आहेत.केवळ ‘विद्युत सहाय्यक’ एकमेव क्षेत्र असे होते की, त्यामध्ये महिला मागे होत्या. परंतु आता त्याही क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिमंडलांतर्गत कोकण झोनमध्ये विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पुरूष विद्युत सहाय्यकांबरोबर महिला वायरवूमनची नियुक्ती करण्यात आली. दहावी नंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात त्यांनी ‘इलेक्ट्रीशन’चे प्रशिक्षण पूर्ण करून महावितरणच्या ‘विद्युत सहाय्यक पदावर २९ महिला कार्यरत आहेत.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेले आहेत. विजेचे जाळे पसरलेले आहे. कोकणात पाऊसही मोठ्या प्रमाणावर होतो. डिस्क इन्स्युलेटर,पीन इन्स्युलेटर फुटली किंवा तारेचे घर्षण होऊन वीजपुरवठा बंद पडणे, वाहिनीवर झाड किंंवा झाडाची फांदी कोसळून वीज पुरवठा बंद पडणे अशा कारणांमुळे वीजपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असतो. किंबहुना पोलवर चढून ती समस्या दूर करावी लागते. संबंधित समस्या रात्री - अपरात्री किंवा तीनही ऋतूमध्ये सोडविणे कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाण ठेवून महिला विद्युत सहाय्यक कार्यरत आहेत. सन २०१३मध्ये महिला विद्युत सहाय्यकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना विविध उपकेंद्रात काही दिवस सेवा प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना त्यातील अडथळे, समस्या व धोका याची माहिती देण्यात आली. तद्नंतर पोलवर चढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टप्प्याटप्प्याने कार्यालयीन कामकाज, वीजमीटर तपासणे, दुरूस्ती करणे, किंवा ग्राहकांना देणे शिवाय जनमित्रांसमवेत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आज वायरवुमन विजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करत आहेत. काही वायरवुमनची तर आॅपरेटर्सपदी नियुक्ती झाली आहे. वास्तविकरित्या आव्हानात्मक काम या भगिनींनी स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)
1इलेक्ट्रिकचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती.
2 विजेच्या खांबावर चढून वायरवुमन करत आहेत वीज दुरूस्ती.
3 विजेच्या बाबतीत ‘दया, माया, शांती, क्षमा’ याला थारा नसल्याने अवघड काम.