दोडामार्गमध्ये नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच

By admin | Published: November 24, 2015 12:02 AM2015-11-24T00:02:58+5:302015-11-24T00:19:54+5:30

आज नगराध्यक्ष निवड : वैभववाडीत काँग्रेसपुरस्कृत रवींद्र रावराणे निश्चित

Rope picking for the post of city president at Doda road | दोडामार्गमध्ये नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच

दोडामार्गमध्ये नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच

Next

वैभववाडी/दोडामार्ग : वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसपुरस्कृत वाभवे-वैभववाडी नगरविकास आघाडीचे अपक्ष उमेदवार रवींद्र रावराणे यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. दोडामार्गमध्ये युतीमधील शिवसेना आणि भाजप यांच्यातच नगराध्यक्षपदावरून रस्सीखेच होती. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या प्रसादी यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपचे सुधीर पनवेलकर आणि काँग्रेसचे संतोष नानचे यांच्यात थेट लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्याने संध्या प्रसादी नाराज असून त्याचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. कसई दोडामार्ग नगर पंचायत निवडणूक युतीच्या माध्यमातून लढलेल्या सेना-भाजपने नगराध्यक्षपदासाठी मात्र आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा दावा केला होता. नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सेनेकडून संध्या प्रसादी, तर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सुधीर पनवेलकर यांनी दावा केला. दोन्ही पक्षांची नेतेमंडळी सर्वांत पहिल्यांदा नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा व्हावा, यासाठी आग्रही होते. नगराध्यक्षपदावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची शिष्टाई फळाला आली नव्हती. दोन्ही पक्षांचे समान संख्याबळ असल्याने त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल, या आशेने काँगे्रसकडून संतोष नानचे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ सहा असल्याने आघाडीचा नगराध्यक्ष बसू शकला असता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सेनेने बॅकफुटवर जात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पनवेलकर यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे. भाजप विरुद्ध काँगे्रस अशी नगराध्यक्षपदासाठीची थेट लढत होईल.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नगरविकास आघाडीच्या सुचित्रा कदम व काँग्रेसच्या दीपा गजोबार यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे काँग्रेसपुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार रवींद्र रावराणे आणि महायुती पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे रोहन रावराणे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण पाचजणांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. यामध्ये काँग्रेसपुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीतर्फे अपक्ष रवींद्र रावराणे यांनी व काँग्रेसच्या दीपा गजोबार यांनी अर्ज सादर केले होते, तर महायुती पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे रोहन रावराणे व अपक्ष सुचित्रा कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

वैभववाडीत कॉँग्रेसकडून सावधगिरी
काँग्रेसपुरस्कृत वाभवे-वैभववाडी नगरविकास आघाडीचे नऊ, तर महायुती पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे वाभवे-वैभववाडी विकास आघाडीचे पारडे जड आहे. तरीही विरोधात जयेंद्र रावराणे यांचे सुपुत्र असल्याने काँग्रेसच्या गटाकडून कमालीची सावधगिरी बाळगली जात आहे.
सेनेची उपनगराध्यक्षपदावर बोळवण?
दरम्यान, दोडामार्गात सेनेला उपनगराध्यक्षपद व बांधकाम सभापतिपद देण्यावर दोन्ही मित्रपक्षात एकमत झाल्याची चर्चा आहे. या बदल्यात नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे राहील, असा समझोता दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींत वरिष्ठ स्तरावर झाल्याची चर्चा आहे.

Web Title: Rope picking for the post of city president at Doda road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.