रास्ता रोको, मोर्चाने सावंतवाडी दणाणली
By admin | Published: June 3, 2014 01:45 AM2014-06-03T01:45:07+5:302014-06-03T02:03:59+5:30
‘त्या’ आक्षेपार्ह लिखाणाचे पडसाद, बुधवारी सावंतवाडी बंदची दिली हाक
सावंतवाडी : शिवाजी महाराज तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह चित्रण फेसबुकवर केल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको करण्यात आला. तसेच शहरातून निषेध फेरी काढून पोलीस निरीक्षक रणजित देसाई तसेच प्रभारी तहसीलदार शशिकांत जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वानी जोरदार घोषणा दिल्या. तसेच विघातक कृत्य करणार्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. गेले दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण तसेच चित्र फेसबुक व अन्य सोशल मिडियावर टाकण्यात आले आहे. यावरून सर्वत्र संतापाचे वातावरण असून यांचे पडसाद सोमवारी सावंतवाडी उमटले. काँग्रेसचे युवा नेते संजू परब यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रथम आवाज उठवला. त्यानंतर येथील विश्रामगृहावर सर्वपक्षीय एकत्रित आले आणि या घटनेचा निषेध केला. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनारोजीन लोबो, काँॅग्रेसचे संजू परब, उमेश कोरगावकर, अशोक दळवी, राजू कासकर, शिवसेनेचे रूपेश राऊळ, नकूल पार्सेकर, सुधीर आडिवडेकर, आनंद नेवगी, सुरेश भोगटे, शब्बीर मणियार, शैलेश तावडे, मंदार नार्वेकर महेश सावंत आदी प्रमूख नेत्यांनी येथील पर्णकूटी विश्रामगृहावर बैठक घेतली. या बैठकीत एक निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनात घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचे युवा नेते संजू परब यांनी हा निषेध मोर्चा असून संपूर्ण शहरातून निषेध फेरी काढत ती शातंतेच्या मार्गाने फेरी असावी, असे सांगण्यात आले. त्यानुसार सर्वजण विश्रामगृहावरून प्रथम निवेदन घेऊन पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यापासून निघालेली निषेध फेरी मोती तलाव मुख्य बाजारपेठ, बापूसाहेब पुतळ्यानजीक मुख्य महामार्गावर आली. तेथे काहीकाळ रास्ता रोको ही करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुखांचा विजय असो, अशा अनेक घोषणानी परिसर चांगलाच दणाणून गेला. तब्बल दहा मिनिटे मुख्य महामार्ग रोखून धरण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रास्ता रोको करणार्या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला केले. तहसीलदार शशिकांत जाधव यांनी या मोर्चा सामोरे जात निवदेन स्वीकारले. तसेच चुकीचे कृत्य करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा विर्सजित करण्यात आला. या मोर्चात विलास सावंत, दिलीप भालेकर, संतोष गवस, प्रकाश बिद्रे, बंड्या कोरगावकर, नगरसेवक विलास जाधव, देवेंद्र टेमकर, संतोष जोईल, समीर पालव, लवू वारंग, निखील पाटील, गणेश पडते, बाळा कुडतरकर आदी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरातील वातावरण तंग झाले होते. पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात होता. (प्रतिनिधी)