आरपीआय जिल्हाध्यक्षांसह चौघांना मारहाण, शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:39 PM2017-08-10T23:39:02+5:302017-08-10T23:39:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली/खारेपाटण : तालुक्यातील चिंचवली-बौद्धवाडी स्मशानभूमीचा वाद आणखीनच चिघळला आहे. त्यातूनच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्यासह चौघांना शिवीगाळ करीत मारहाण झाली आहे. गंभीर जखमी असलेल्या कांबळे यांच्यावर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी तानाजी कांबळे यांच्यासोबत मारहाण झालेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे
महाराष्ट्र सचिव तसेच सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक मधुकर देऊ मोहिते (६१, रा. ठाणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी चिंचवली येथील तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत भालेकर यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मधुकर मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे की, चिंचवली-बौध्दवाडी येथील स्मशानभूमीच्या प्रश्नाबाबत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना तेथील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. मंत्री बडोले यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाºयांना त्याबाबत कळविल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाºयांची एक सदस्यीय समिती नेमली होती. त्यामुळे प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी १0 आॅगस्ट रोजी चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयात संबधित ग्रामस्थांची बैठक बोलविली होती. तसेच प्रांताधिकाºयांनी या बैठकीला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांना पत्र देऊन निमंत्रित केले होते.
त्यामुळे तानाजी कांबळे यांच्यासोबत पक्षाचा सचिव म्हणून आपण इतर पदाधिकारी व सहकाºयांसोबत तिथे गेलो होतो. त्यावेळी आमच्यासोबत चिंचवली बौध्दवाडी येथील स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते. गुरुवारी दुपारी १२.३0 वाजता आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहोचलो. ग्रामपंचायतीच्या गेटसमोर सूर्यकांत भालेकर, स्वप्नील भालेकर, सुनील भालेकर, रविंद्र गुरव, राजू भालेकर, श्रीकृष्ण भालेकर, श्रीकांत भालेकर, देवेश भालेकर, अनिल पेडणेकर, प्रवीण गुरव, जयदास भालेकर, सागर भालेकर असे ४0 ते ४५ लोकांचा जमाव होता.
त्यांनी आम्हांला बैठकीच्या ठिकाणी जायला अटकाव केला. तसेच तुम्हांला आत जाता येणार नाही. तुम्ही बाहेर थांबा असे सांगितले. आम्हांला प्रांताधिकाºयांनी बोलाविल्याचे आम्ही भालेकर यांना सांगितले. मात्र, त्यांनी काहीही न ऐकता माझ्या थोबाडीत मारली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. मी जमिनीवर पडल्यावरही मारहाण करण्यात आली. यामध्ये इतर लोकही सहभागी होते. त्यामुळे माझ्या उजव्या हाताला मार लागलेला आहे. तसेच माझा मोबाईल गहाळ झाला असून चष्माही तुटला आहे.
त्याचप्रमाणे माझ्यासोबत असलेले तानाजी कांबळे, त्यांची पत्नी आरती कांबळे व त्यांचा मुलगा अभिषेक यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच सूर्यकांत भालेकर यांच्यासह इतरांनी तानाजी कांबळे तेथून पळत असताना त्यांची पाठ धरून रस्त्याच्या बाजूच्या गटारात पाडून दंडुक्याने मारहाण केली. त्याचबरोबर शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या पाठीला, डोक्याला जबर मार लागला आहे.
त्यावेळी तिथे रूपेश कांबळे, सचिन पवार, शोभा कांबळे, गंगाधर कांबळे हे ग्रामस्थ उपस्थित होते. मला स्वप्नील भालेकर मारहाण करीत असताना शोभा कांबळे यांनी त्यांच्या हातात असलेला दंडुका पकडल्याने माझे प्राण वाचले आहेत, असेही या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर तानाजी कांबळे यांच्यासह जखमी झालेल्यांना काही कार्यकर्त्यांनी उपचारासाठी तत्काळ कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर तानाजी कांबळे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे एकच हलकल्लोळ उडाला. त्यामुळे या घटनेची माहिती घेत प्रांताधिकारी नीता सावंत यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
प्रांताधिकाºयांकडून
अक्षम्य दुर्लक्ष
मारहाणीची घटना घडत असताना प्रांताधिकारी कार्यालयात फक्त बसून राहिल्या. त्यांनी या घटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांनी वेळीच कृती करणे आवश्यक होते. तर घटनेनंतर दीड तासाने पोलीस घटनास्थळी आले. त्यामुळे त्यांना या घटनेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते, असे मधुकर मोहिते यांनी पोलीस ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कार्यकर्त्यांची रुग्णालयात धाव !
या घटनेवेळी आरपीआयचे जिल्हा सचिव मोहन जाधव, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. घटनेची माहिती समजताच आरपीआयचे उपाध्यक्ष खंबाळकर तसेच कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नाना डामरेकर, संदीप कदम, रमाकांत जाधव,आदी नेतेही उपजिल्हा रुग्णालय तसेच पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.