पोलिसांनी ग्राहक बनून पकडल्या 1 कोटी रुपयाच्या जुन्या नोट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 07:03 AM2018-08-19T07:03:12+5:302018-08-19T07:04:21+5:30
सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसरातून तिघे अटकेत
सावंतवाडी: जुन्या पाचशे हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सावंतवाडी बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांकडून पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांनी स्वत: ग्राहक बनून ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, सत्यजित पाटील, जयेश सरमळकर, शांताराम परब यांचा सहभाग होता. सावंतवाडी शहरात एका अज्ञात स्थळी एक कोटी रूपये ठेवण्यात आले होते. याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च ग्राहक बनण्याचे ठरवले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक फडणीस यांनी स्वत: ग्राहक बनून त्या तिघाशी संपर्क केला. आम्ही तुम्हाला एक कोटीच्या बदल्यात 25 लाख देतो, अशी ऑफर त्यांना देण्यात आली. त्याप्रमाणे ते तिघेजण ठरल्याप्रमाणे एका बॅगेत पैसे घेऊन काल रात्री एसटी बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी फडणीस यांनी त्याच्यांशी काही वेळ चर्चा केली आणि पैसे घेण्याची वेळ आली तेव्हा त्या तिघांना आपण पोलीस असल्याचे सांगत बॅगसह ताब्यात घेतले. या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग या नोटा तपासणार आहे.