शेडगे कुटुंबीयांना १५ लाखांची मदत, वैभव नाईक यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 10:52 AM2019-11-06T10:52:04+5:302019-11-06T10:59:50+5:30
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीतून आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.
कुडाळ : गव्याच्या हल्ल्यात माणगांव उपवडे देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे यांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीतून आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.
आज आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून अजूनही काही विशेष मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर, माणगाव विभाग प्रमुख बबन बोभाटे, कृष्णा धुरी, अॅड. राऊळ आदी उपस्थित होते.
८ सप्टेंबर रोजी सुभाष शेडगे यांच्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. गोवा बांबोळी येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शेडगे कुटुंबीयांच्या दु:खद प्रसंगात आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या पाठिशी राहून वनअधिकारी समाधान चव्हाण यांच्याशी चर्चा करून शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर तातडीने आमदार वैभव नाईक यांनी शेडगे कुटुंबीयांना शासनाची १५ लाख रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. यामध्ये १० लाख रूपये शेडगे यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले तर ५ लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला