‘हत्ती हटाव’साठी ८० लाख रुपये मंजूर
By admin | Published: August 26, 2014 10:18 PM2014-08-26T22:18:37+5:302014-08-26T22:19:28+5:30
आॅक्टोबरपासून मोहीम सुरू होण्याची शक्यता; भूल देऊन कार्यवाही: विनायक राऊत
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या तीन हत्तींना हटविण्यासाठी राज्य सरकारकडून ८० लाख रुपये मंजूर झाले असून, पावसाळ्यानंतर आॅक्टोबर महिन्यात ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी कर्नाटकातील प्रशिक्षित हत्तींना जिल्ह्यात आणले जाणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी कणकवलीत दिली.
जिल्ह्यात एक मादी व दोन नर हत्ती असून या हत्तींना हटविण्यासाठी आतापर्यंत झालेले प्रयत्न विफल झाले आहेत. आता या हत्तींना भूल देऊन हटविण्यासाठी पूर्णत: वेगळी पद्धत राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी कर्नाटकमधून चार प्रशिक्षित हत्ती जिल्ह्यात आणले जातील. या हत्तींसह ३०-४० कर्मचाऱ्यांचा पूर्ण लवाजमा येणार आहे. त्यामध्ये हत्तींचे डॉक्टर्स, नर्सेस, माहूत, चारा घालणारे, आदींचा समावेश असेल. मालवण तालुक्यातील आंबेरी येथे या हत्तींसाठी मुक्काम करण्याचे ठिकाण निवडण्यात आले आहे. या ठिकाणी हत्तींसाठी विशेष अधिवास तयार करण्यात येईल. हत्तींसाठी चारा, गूळ, बदाम, आदींची बेगमी केली जाईल. या हत्तींना रेडिओ चिप्स बसविल्या जातील. कर्नाटकच्या पथकासमवेत स्थानिक सुमारे ३० लोकांचा समावेश केला जाईल. हे पथक आंबेरी येथे चार महिने राहील.या पथकातील प्रशिक्षित हत्ती आंबेरीत स्थिरावल्यानंतर काही कालावधीनंतर जंगली हत्तींसोबत या हत्तींना मिसळवून त्यांना हळूहळू आंबेरी येथील अधिवासात आणण्यात येईल. आंबेरी येथील अधिवासात आणल्यानंतर आसाम येथील प्रशिक्षित व अधिकृत डॉक्टरांकडून जंगली हत्तींना भुलीचे इंजेक्शन देऊन कर्नाटकात पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी कर्नाटकमधील पथक सुमारे चार महिने जिल्ह्यात वास्तव्य करणार आहे. ही मोहीम पावसाळ्यानंतर म्हणजे आॅक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली. (प्रतिनिधी)