ग्रामीण भाग आजही १९व्या शतकातच

By admin | Published: December 25, 2015 10:44 PM2015-12-25T22:44:32+5:302015-12-26T00:09:15+5:30

-कोकण किनारा

Rural areas still in the 19th century | ग्रामीण भाग आजही १९व्या शतकातच

ग्रामीण भाग आजही १९व्या शतकातच

Next


तसे पाहिले तर घटना साधी होती. नेहमीच्याच जगण्यातली. एका मुलीचे लग्न ठरले. खरे तर आनंदाचीच गोष्ट. प्रथेनुसार घरातल्या मोठ्यांनी आपल्याच नात्यातल्या एका बुजुर्गांना पत्रिका नेऊन दिली. पत्रिका हातात पडेपर्यंत त्या बुजुर्ग माणसाला लग्न जुळवले जात आहे, याची कल्पना नव्हती. पत्रिका पाहिल्यावर तो उडालाच आणि त्याने पत्रिका घेऊन आलेल्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलीचे लग्न ठरवताय, ती अजून लहान आहे. तिचे हे शिकण्याचे वय आहे. तिच्या वयाची अजून १८ वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे तिचे लग्न करू नका. चांगले स्थळ हातात आलाय, म्हणून त्या घरातली मंडळी काही ऐकायला तयार होईनात. त्यांची मानसिकता बघून त्या बुजुर्गाने अखेर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला. आपल्या नातीचे लग्न ठरवले जात आहे आणि ती अजून सज्ञान झालेली नाही. त्या अर्जाची पोलिसांनी लगेचच दखल घेतली. दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून घेतले आणि सज्ञान होण्यापूर्वी मुलीचे लग्न करणे अयोग्य असल्याचे त्यांनी समजावले. त्यामुळे विवाह थांबवण्यात आला.
ही घटना कुठल्या आदिवासी भागातील नाही. रत्नागिरी तालुक्यातील आहे. मुंबई जवळ असल्याने कोकणात आधुनिकतेचे वारे लवकर पोहोचतात, अशी आपली समजूत आहे. पण ग्रामीण भाग मात्र अजूनही १८-१९व्या शतकातच आहे. मुलगी सज्ञान होण्याआधीच तिचे लग्न करण्याचा ग्रामीण भागातील प्रवाह अजूनही तसाच आहे. ही घटना तिच्या आजोबांनी पुढे आणली म्हणून लक्षात आली. पण कुणाचाही आक्षेप नसला तर असे विवाह होऊनही जातात.
जग चंद्रावर आणि मंगळावर जाऊन राहण्याच्या गोष्टी करत असताना आपण अजूनही आधीच्याच शतकामध्ये जगत असल्याची अनेक उदाहरणे वारंवार पुढे येत आहेत. आधुनिकीकरणाचे वारे फक्त भौतिक पातळीवरच आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, स्वयंपाकघरातली अत्याधुनिक साधने आहेत. पण आपल्या विचारांमध्ये आधुनिकता आलेली नाही, याचे दुर्दैव वाटते.
भारतातच इंडिया आणि भारत असे दोन भाग असल्याचे अनेकदा म्हटले जाते. जे शहरी भाग पुढारले आहेत, ते खूपच मोठ्या प्रमाणात पुढारले आहेत आणि ग्रामीण भाग अजूनही मूळ प्रवाहात आलेले नाहीत. अर्थात यात त्यांचा दोष नाही. आरोग्य, शिक्षणाबाबतची जागृती करण्यात, प्रसार करण्यात आपल्या यंत्रणा आणि माध्यमे कमी पडत आहेत, असाच यातून अर्थ निघतो.
जिथे नोकरीच्या, व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी सर्वच प्रकारच्या सुविधा वाढत जातात. अशा भागांना सरकारकडूनही महसुली महत्त्व दिले जाते. त्यामुळे आरोग्य, शिक्षण अशा सुविधा मोठ्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये सहज उपलब्ध होतात. पण ग्रामीण भाग मात्र त्यापासून खूपच वंचित राहतो. आजच्या घडीला शाळा प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या आहेत. पण त्या अपेक्षेप्रमाणे कार्यरत आहेत का? किती वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात जाऊन राहतात? किती शिक्षक आपल्या नेमून दिलेल्या शाळेच्या गावात राहतात. खरे तर या दोन घटकांकडून जागृतीचे विविध उपक्रम राबवले जाणे आवश्यक आहे. मुलीचे लग्नाचे वय किती असावे, याचे केवळ पोस्टर लावून जागृती होते का?
कुठलाही दिनविशेष असला की, शहरी भागात जनजागृती रॅली काढली जाते. पण शहरी भागाला त्याची गरज नाही. त्याची खरी गरज आहे ती ग्रामीण भागात. मुला-मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी शिक्षण द्यायला हवे, हा विचार ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. लग्नाचे वय १८ का आहे, याची जागृती करण्यासाठी ग्रामीण भागात घराघरापर्यंत जाण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी ग्रामीण भागात झिरपणे आवश्यक आहे. पण आपल्या राजकीय पातळीवर त्याकडे दुर्लक्ष होतेच, शिवाय सामाजिक संस्थांमध्येही त्याबाबत खूप मोठी उदासिनता आहे. काहीतरी वस्तू वाटप करण्यासाठी ग्रामीण भागापर्यंत पोहोचून त्या लोकांबरोबर छायाचित्र काढणाऱ्या संस्थांची संख्या अधिक आहे. पण शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा, त्याबाबतची जागरूकता कितीशा लोकांपर्यंत पोहोचली आहे, याची माहिती मात्र सामाजिक संस्थांना नाही. त्यासाठी प्रयत्नही होत नाही.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे ग्रामीण भागात पोहोचली आहेत. पण त्यांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. शहरी भागातील शाळांमध्ये इ-लर्निंग दुसऱ्या टप्प्यावर पोहोचले आहे. पण ग्रामीण भागात मात्र अजूनही पहिल्या टप्प्यावरच अडखळणे सुरू आहे. आत्ता आत्ता डिजिटल शाळांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एखादाच मुलगा चमकतो, तो स्वत:च्या क्षमतेमुळे. पण इतर मुले मात्र चाचपडतच राहतात. कारण ती शहरी भागातील मुलांच्या स्पर्धेत उतरू शकत नाहीत. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारला मोहीम आखण्याची वेळच येऊ नये, असे काम शिक्षक, सामाजिक संस्थांनी करायला हवे. पण शिक्षण नेमून दिलेल्या शाळेच्या गावात राहातच नाहीत. त्यामुळे किती मुले अजून शाळेत येत नाहीत, याची त्यांना कल्पनाच नसते.
मोबाईलचे वारे ग्रामीण भागातही झपाट्याने वाहत आहे. पण मोबाईल आले म्हणजे क्रांती झाली, असा अर्थ नाही. वैचारिक परिवर्तनासाठी अजूनही खूप कामाची गरज आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावण्याची प्रथा अजूनही कुठे कुठे सुरू आहे, याचा अर्थ सामाजिक जागरूकतेसाठी खूप काम होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागही समाजाच्या मूळ प्रवाहात आले तर ग्रामीण भागातही उत्पादकता वाढेल आणि अनिष्ट प्रथा पूर्णपणे नष्ट होतील. गरज आहे ती एकत्रित प्रयत्नांची...!

मन ोज मुळ््ये

Web Title: Rural areas still in the 19th century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.