‘ग्रामीण रोहयो’ला प्रतिसादच नाही
By admin | Published: May 14, 2015 10:04 PM2015-05-14T22:04:39+5:302015-05-15T00:02:50+5:30
राजापूर तालुका : शासनाच्या योजनेचा उडाला बोजवारा
राजापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांना चांगला प्रतिसाद नसल्याचे तालुक्यात चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा बोजवारा उडाला आहे.या योजनेसाठी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटातून शिवणे बुद्रुक, मिळंद, पन्हळेतर्फ सौंदळ, देवीहसोळ, धाऊलवल्ली व पडवे या गावांची मॉडेल गावे म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार निवडण्यात आलेल्या गावांनी २१३ प्रस्ताव सादर केले. त्यातील १७२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर ४१ कामे अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. १७२ प्रस्तावांपैकी १०६ कामे अद्याप सुरुच झालेली नाहीत.शिवणेबुद्रुक गावातून २१ कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यातील १८ मंजूर कामांपैकी ७ कामे सुरु आहेत. मिळंदमधील ७३ प्रस्ताव आले होते. त्यातील ६९ मंजूर कामांपैकी १७ कामे सुरु आहेत. पन्हळेतर्फे सौंदळमधील १४ प्रस्ताव सादर झाले होते. त्यातील ११ मंजूर कामांपैकी ६ कामे सुरू आहेत. देवीहसोळमधील ३९ प्राप्त प्रस्ताव आले होते. त्यातील ३५ मंजूर कामांपैकी १८ कामे सुरू आहेत. धाऊलवल्लीतील ४१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील २६ मंजूर कामांपैकी १३ कामे सुरू आहेत. पडवे गावातील २५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील १३ मंजूर कामांपैकी ४ कामे सुरु आहेत. मात्र या योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत पंचायत समिती प्रशासनाला किती आस्था आहे, हेच दिसून येते.
या कामामध्ये वैयक्तिक शौचालय सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, शोष खड्डा खोदणे, गांडूळसहीत अन्यखतांची निर्मिती करणे, फळबाग लागवड आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे. तथापि मॉडेल गावे म्हणून निवडण्यात आलेल्या या गावांचीच कामे रखडली आहेत. परिणामी शासनाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. (प्रतिनिधी)
सहा जिल्हा परिषद गटातून शिवणे बुद्रुक, मिळंद, पन्हळेतर्फ सौंदळ, देवीहसोळ, धाऊलवल्ली व पडवे या गावांची मॉडेल गावे म्हणून निवड.
निवडण्यात आलेल्या गावांनी केले २१३ प्रस्ताव सादर.
१७२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर ४१ कामे अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत.