एस. टी. रोको आंदोलन स्थगित
By Admin | Published: February 27, 2016 01:31 AM2016-02-27T01:31:13+5:302016-02-27T01:31:13+5:30
नारायण राणेंची माहिती : एस. टी. अधिकारी, पोलीस अधीक्षकांची मध्यस्थी
कणकवली : दोडामार्ग बसस्थानक उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २० प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी जबरदस्तीने गुन्हा नोंदविला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून जिल्ह्यात एस. टी. बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र, एस. टी. चे व्यवस्थापकीय संचालक रत्नपारखी यांनी दूरध्वनीद्वारे विनंती केली.
तसेच विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी प्रत्यक्ष भेटून आंदोलन करू नये, असे लेखी पत्र दिले आहे, तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित घटनेची पारदर्शकपणे चौकशी होईल, कोणाच्याही दडपणाखाली न राहता निष्पक्षपाती चौकशी करून याप्रकरणी कार्यवाही करू, असे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे काँग्रेसच्यावतीने घोषित करण्यात आलेले आजचे आंदोलन मागे घेत आहोत, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दुपारी जाहीर केले.
तसेच यापुढे पालकमंत्र्यांनी अथवा शासनाने सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा दडपशाही केल्यास तसेच जिल्ह्यातील जनतेवर अन्याय केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा देतानाच जिल्ह्यातील जनतेसाठी आमची काहीही करण्याची तयारी आहे. येथील जनतेला कसलाही त्रास होऊ देणार नाही, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधुसूदन बांदिवडेकर, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, आदी उपस्थित होते.
दोडामार्ग बसस्थानक उद्घाटनाच्या विषयावरून घडलेल्या घडामोडींविषयी नारायण राणे यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, काँग्रेसच्या २0 पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी जबरदस्तीने गुन्हा दाखल केला आहे. पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून सुडाने ही कृती करण्यात आली आहे.
मुळात शासकीय कामात व्यत्यय आणण्यासारखी घटना घडलीच नव्हती. कोणीही शासकीय कामात हस्तक्षेप केला नव्हता. बसस्थानकाचे उर्वरित काम पूर्ण केल्यानंतर उद्घाटन करण्याबाबतचे पत्र एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. असे असतानाही ते निघून गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हा अन्याय आहे. त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा काँग्रेसने गुरुवारी सायंकाळी बैठक घेऊन शुक्रवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, शुक्रवारी सकाळी एस.टी.चे विभाग नियंत्रक चेतन हसबनीस व इतर अधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील मोरे उपस्थित होते. आंगणेवाडी यात्रेला आलेले भाविक तसेच बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी. बंद करू नये, असे विनंती पत्र विभाग नियंत्रकांनी मला दिले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनीही संबंधित प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याचे तसेच कुणावरही विनाकारण कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही घोषित केलेले एस. टी. बंद आंदोलन मागे घेत आहोत, असे यावेळी राणे यांनी सांगितले. (वार्ताहर)
कडक पोलीस बंदोबस्त
काँग्रेसच्या एस. टी. बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरासह जिल्ह्यातील बसस्थानकांसह अन्य परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांची गस्ती पथकेही कार्यरत होती.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
नारायण राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, संदेश सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ओरोस येथे त्यांची भेट घेतली. आपले म्हणणे मांडले. त्यानंतर त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पारदर्शक तपास करण्याचे आश्वासन दिले.
एस.टी.च्या अधिकाऱ्यांची राणेंशी चर्चा
शुक्रवारी सकाळी एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी कणकवली येथील निवासस्थानी नारायण राणे यांची भेट घेतली. तसेच निर्णय घेण्यासाठी एक तासाची मुदत मागितली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काँग्रेस कार्यालयात पुन्हा दाखल होत नारायण राणे यांच्याशी चर्चा करून आंदोलन न करण्याचे विनंती पत्र दिले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते, तर विभाग नियंत्रक चेतन हसबनीस, विभागीय वाहतूक अधिकारी बी. जी. कदम, यादव, अशोक राणे, कृष्णा राणे, गणेश शिरकर, संजय सावंत आदी उपस्थित होते.