सह्याद्रीच्या कुशीत मिळणार ग्रामीण पर्यटनाला चालना 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 06:09 PM2018-12-31T18:09:35+5:302018-12-31T18:09:49+5:30

पर्यटन महामंडळाची ‘होम स्टे’ संकल्पना : नव्या वर्षात पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करणा-या व्यावसायिकांसाठी फायदेशीर 

Sahyadri will get the benefits of rural tourism | सह्याद्रीच्या कुशीत मिळणार ग्रामीण पर्यटनाला चालना 

सह्याद्रीच्या कुशीत मिळणार ग्रामीण पर्यटनाला चालना 

googlenewsNext

-सिद्धेश आचरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला ख-या अर्थाने पर्यटन व्यवसायाने तारले. मनमोहक आणि स्वच्छ निळाशार समुद्र किना-याची भुरळ पर्यटकांना पडू लागली. त्यामुळे गेल्या २० वर्षांचा विचार करता सागरी पर्यटन जोमाने वाढले. अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. मात्र ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, ऐतिहासिक वास्तू पर्यटन, जंगल सफर आदींकडे दुर्लक्ष झाला. दरवर्षी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर येणारा लाखो पर्यटकांचा ओढा पाहता नयनरम्य, हिरव्यागार ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जसे समुद्रकिनारी लक्ष केंद्रीत केले तसे आता सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये ‘होम स्टे’ म्हणजेच न्याहारी निवास संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी होम स्टे संकल्पना राबविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे येणाºया काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ग्रामीण भागही पर्यटनदृष्ट्या विकसित होणार आहे. त्यामुळे डोंगर, दºयांच्या पायथ्याशी असलेले खेडेगावांना नवी ओळख मिळणार असून जिल्ह्यासाठी पर्यटन व्यावसायिकांकडून नव्या वर्षाची ‘गुड न्यूज’ असल्याची मानली जात आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे १२१ किमीची नयनरम्य किनारपट्टी लाभली आहे. खासकरून मालवण तालुक्यातील मालवण, तारकर्ली, देवबाग आणि अलीकडच्या काळात आचरा, तोंडवळी, तळाशील वायरी हे किनारे लाखो पर्यटकांनी अक्षरश: गजबजून गेलेले असतात. मालवणात किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाबरोबरच समुद्राखालील अद्भुत विश्व पाहण्याची संधी सागरी संशोधक तथा स्कुबा डायव्हिंग सेंटरचे प्रमुख डॉ. सागर कुलकर्णी यांनी उपलब्ध करून दिल्याने मालवणसह तारकर्ली देवबागमधील पर्यटन अल्पावधीत वाढले. दरवर्षी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली. १५ वर्षांपूर्वी हजाराच्या संख्येत येणारे पर्यटक लाखोंच्या संख्येने दाखल होत असल्याची आकडेवारीही उपलब्ध आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर मर्यादा येऊ लागल्या. 
 
ग्रामीण पर्यटनातून अधोरेखित होणार कोकणचे गावपण
देशी विदेशी पर्यटकांना सागरी पर्यटनाबरोबर ग्रामीण पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी एमटीडीसीने सह्याद्रीच्या कुशीत होम स्टे संकल्पना राबविण्याचा विचार सुरू केल्याने नव्या पर्यटन व्यावसायिकांना रोजगार आणि ग्रामीण पर्यटनाचे नवे दालन खुले होणार आहे. ग्रामीण भागातील संस्कृती, परंपरा तसेच ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी प्रकाशझोतात येण्यास मदत होणार आहे. एमटीडीसीच्या या नव्या प्रयोगाला महाराष्ट्र शासनाकडून ‘कोकण ग्रामीण पर्यटन’ या योजनेचा हातभार मिळू शकतो. कोकणातील अस्सल ढंगाचे ‘गावपण’ याच होम स्टे संकल्पनेतून अधोरेखित होणार आहे. 
 
ग्रामीण पर्यटन रोजगाराचे नवे दालन
सह्याद्री पर्वतरांग जैवविविधतेने नटलेली मानली जाते. आंबोलीपासून ते गगनबावडाच्या टोकापर्यंत निरनिराळे बेडूक, सापाच्या विविध प्रजाती, ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती सह्याद्री पर्वताच्या कुशीत आढळतात. त्यामुळे येणा-या  काळात एमटीडीसीच्या नव्या प्रयोग यशस्वी होण्यासाठी जंगल दर्शन, पक्षी निरीक्षण, साहसी प्रकार आदी निसर्गाशी आणि मालवणी संस्कृतीशी निगडीत असलेले उपक्रम हाती घ्यायला हवेत. सागर किनाºयाबरोबरच कातळशिल्पे, पुरातन लेणी, ऐतिहासिक वास्तू उजेडात येणार रोजगार व व्यवसायाचे नवे पर्व म्हणून ग्रामीण पर्यटनाकडे पाहिले जातेय.

Web Title: Sahyadri will get the benefits of rural tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.