सह्याद्रीचा ऱ्हास पर्यावरण,अर्थकारणाचा कणाच मोडेल : मधुकर बाचुळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:47 AM2019-02-28T11:47:26+5:302019-02-28T11:49:11+5:30
तब्बल १२० नद्यांचे उगमस्थान असलेला, प्रचंड जैववैविध्य असलेला सह्याद्री बेसुमार जंगलतोड, उत्खनन यामुळे धोक्यात आला आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन हा ऱ्हास न थांबवल्यास पर्यावरणाचा आणि अर्थकारणाचा कणा मोडून पडेल. प्रसंगी केरळसारखी नैसर्गिक आपत्तीही कोसळु शकते, असा इशारा पर्यावरणवादी आणि ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग : तब्बल १२० नद्यांचे उगमस्थान असलेला, प्रचंड जैववैविध्य असलेला सह्याद्री बेसुमार जंगलतोड, उत्खनन यामुळे धोक्यात आला आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन हा ऱ्हास न थांबवल्यास पर्यावरणाचा आणि अर्थकारणाचा कणा मोडून पडेल. प्रसंगी केरळसारखी नैसर्गिक आपत्तीही कोसळु शकते, असा इशारा पर्यावरणवादी आणि ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील माऊली मंदिरात ग्लोब ट्रस्टने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. बाचुळकर यांनी विविध छायाचित्रे, नकाशे, तक्ते, आकडेवारी यांच्या स्लाईड शोच्या माध्यमातून दिलेल्या सह्याद्रीतील जैवविविधता : एक अद्भूत वैश्विक वारसा या सुमारे दोन तासांच्या व्याख्यानातून पश्चिम घाटाचे पर्यावरणीय, अर्थशास्त्रीय महत्व पटवून दिले.
डॉ. बाचुळकर यांच्याहस्ते कुंडीतील वनौषधींच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती उपसंचालक सतीश लळीत, आडाळीच्या सरपंच उल्का गावकर, कोल्हापूर येथील वृत्तछायाचित्रकार अनिल वेल्हाळ उपस्थित होते. ग्लोब ट्रस्टचे पराग गावकर यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर, लेखिका डॉ. सई लळीत, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे संजय देसाई, नम्रता देसाई, सतीश घोटगे, उद्योजक प्रविण गावकर, नंदू गावकर, निवृत्त आॅनररी कॅप्टन मंगेश गावकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात
डॉ. बाचुळकर म्हणाले की, जागतिक तापमानवाढ, वातावरणातील बदल, पाणीटंचाई, अन्नटंचाई हे प्रश्न जगासमोर आवासून उभे आहेत. या भीषण परिस्थितीला मानवाचा पर्यावरणातील अवाजवी हस्तक्षेप आणि पर्यावरणाचा ऱ्हास कारणीभूत आहे. धृवीय प्रदेशातील बर्फ वितळल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून जगातील ४७ देशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पर्यावरणाच्यादृष्टीने सह्याद्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. जगातील १७ महाजैवविविधता देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतातील हिमालय, ईशान्य भारत आणि पश्चिम घाट या तीन भागांचा जैवविविधता प्रदेशात समावेश होतो. जगात जैवविविधतेच्यादृष्टीने अतिसंवेदनशील मानल्या गेलेल्या ३५ क्षेत्रांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे आणि हाच भाग सद्या अतिशय धोक्यात आला आहे.
नैसर्गिक संपत्ती वारसा म्हणून मिळाली
माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी पश्चिम घाटातील सह्याद्रीमधील नैसर्गिक संपदा, प्राणी-पक्षी सृष्टी, जैवविविधता यांचा आणि मानवी जीवनाचा परस्परसंबंध स्पष्ट केला. ते म्हणाले की, ही नैसर्गिक संपत्ती आपणाला वारसा म्हणून मिळाली आहे.
आपण तिचे मालक नाही. तिचे जतन, संवर्धन करुन ती पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु अतिपरिचयात् अवज्ञा अशी आपली अवस्था झाली आहे. अनास्थेमुळे आपण हा वारसा दिवसेंदिवस गमावत चाललो आहोत. मात्र ही अनास्था परवडणारी नाही. या वारशाचे जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.