भक्तांसाठी एस. टी. सज्ज
By admin | Published: September 13, 2015 09:21 PM2015-09-13T21:21:06+5:302015-09-13T22:17:13+5:30
गणेशोत्सव : रत्नागिरी विभागाकडून दररोज १०० गाड्या, मुंबईकर कोकणात दाखल
रत्नागिरी : गणपतीबाप्पांच्या आगमनास केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्ताने मुंबईत स्थिरावलेली मंडळी गणेशोत्सवास आवर्जून गावी परततात. त्यामुळे मुंबईकरांना आणण्यासाठी एस. टी. प्रशासन सज्ज झाले आहे. एकूण २००५ जादा गाड्यांतून मुंबईकर गणेशोत्सवासाठी गावी येणार आहेत.मुंबई, ठाणे, पालघर येथून रत्नागिरी जिल्ह्यात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दि. १२ रोजी १८ गाड्या तर दि. १३ रोजी ६८ जादा गाड्या मुंबईकरांना घेऊन जिल्ह्यात आल्या आहेत. दि. १४ रोजी ३०७, दि. १५ रोजी १३३०, तर दि. १६ रोजी २७५ जादा गाड्या येणार आहेत. सर्वाधिक गाड्या १५ रोजी येणार आहेत.या व्यतिरिक्त रत्नागिरी विभागाकडून दररोज १०० गाड्या सोडण्यात येत असून, त्यात आणखी ८० गाड्या गणेशोत्सवात सोडल्या जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी एस. टी. प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
दिशादर्शनासाठी कर्मचारी तैनात --मुंबईतून कोकणात येण्यासाठी जळगाव, धुळे, अमरावती, विदर्भ येथून चालकांसहित जादा गाड्या मागविण्यात येतात. नवीन चालकांना मार्ग माहित नसल्यामुळे खास दिशादर्शनासाठी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते राजापूर मार्गावर दोन गस्तीपथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विभागीय कार्यालयातील अधिकारीवर्ग महामार्गावर खास लक्ष ठेवणार आहे. अपघात होऊ नये यासाठी गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल.
दुरूस्तीपथक कार्यरत--एस. टी. बंद पडून भाविकांचे हाल होऊ नयेत यासाठी महामंडळातर्फे खास दुरूस्तीपथक महामार्गावर कार्यरत ठेवण्यात येणार आहे. संगमेश्वर येथे दुरूस्तीपथक तर चिपळूणात क्रेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कशेडी येथे चेकपोस्ट तर संगमेश्वर व चिपळूण येथे खास दिशादर्शकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जाताना मार्गात बदल --मुंबई, ठाणे, पालघर येथून येणाऱ्या गाड्या राष्ट्रीय महामार्गावरून येणार असल्या तरी जातानाचे मार्ग बदलण्यात आले आहेत. महामार्गावर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची गर्दी होवून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे जाताना काही गाड्या अणुस्कूरा घाटमार्गे, तर काही गाड्या आंबाघाटमार्गे तर काही गाड्या कोयना-पाटणमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
स्वच्छतेबाबत सूचना --बसस्थानके, स्थानकाच्या आवारातील प्रसाधनगृहे तसेच शौचालयांच्या खास स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय बसस्थानकातील पंखे, विजेचे दिवे सुस्थितीत ठेवण्याबाबत, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच उपाहारगृहात अधिक खाद्यपदार्थ ठेवण्याची सूचनादेखील एस. टी. प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एस. टी. प्रशासनाने स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीही विशेष भर देण्याचे ठरविले आहे.
एस. टी.च्या संख्येत वाढ--गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गाड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०१३ साली मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या आल्या होत्या. २०१४ मध्ये १९१३ गाड्या आल्या होत्या. यावर्षी २००५ गाड्या येणार आहेत. विसर्जनानंतर मुंबईकरांची परतण्याची घाई असते. २१ रोजी विसर्जन झाल्यानंतर मागणीप्रमाणे जादा गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. परतीसाठी ६५० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. हा प्रतिसाद उत्तम असल्याचे मानले जात आहे.
बसस्थानकापर्यंत गाड्या --अनेक ठिकाणी रेल्वेस्थानके व बसस्थानकांमध्ये कमालीचे अंतर आहे. बसस्थानकापर्यंत येण्यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. अनेकवेळा वाहनेही उपलब्ध होत नाहीत. झालीच तर ती अवाच्या सव्वा पैसे उकळतात. यात प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी रेल्वेच्या वेळेत रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यंत खास बस सोडण्यात येणार आहेत. शिवाय ‘डेम’ूने येणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यत गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या विचारात घेता एस. टी. प्रशासनाकडून तशा जास्तीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खबरदारीचा पर्याय म्हणून महामंडळाने महामार्गावर गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे. कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय आगारनिहाय पालक, अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत.
-के . बी. देशमुख, विभागनियंत्रक, रत्नागिरी विभाग.