घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन होणार तरी केव्हा?, कुटुंबावर उपासमारीची वेळ
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 13, 2022 07:00 PM2022-09-13T19:00:04+5:302022-09-13T19:00:47+5:30
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही ठिकाणचे शिक्षकांच्या रजा कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घड्याळी तासिका शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतात. परंतु या शिक्षकांचे मानधन मागील अनेक महिन्यांपासून रखडले असल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मानधन तातडीने देण्याची मागणी या शिक्षकांमधून होत आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.
माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा नेहमीचाच विषय राहिला आहे. गेली काही वर्षे भरती प्रक्रिया बंद आहे. शिक्षकांच्या भरतीची मागणी सातत्याने होत असताना शिक्षक भरती होताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कायमस्वरूपी प्रश्नावर घड्याळी तासिका शिक्षकांचा तात्पुरता उपाय शासन, प्रशासनाकडून केला जात आहे. परिणामी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर अनेक शिक्षक ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत.
शिक्षणमंत्री येथे लक्ष देतील काय?
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांच्या या गंभीर विषयात लक्ष घालून घड्याळी तासिकांवर काम करणार्या शिक्षकांना न्याय मिळवून देणे आवश्यक बनले आहे.
प्रशासनातील काही चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे उच्चशिक्षित युवक, युवती जे समाज घडविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्या श्रमाचे मोलदेखील वेळेत मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
वेळेते मानधनाची शासनाची जबाबदारी
तासिकांवर शिकविणारे शिक्षक उच्च शैक्षणिक पात्रताधारक आहेत. परंतु नोकरी मिळत नसल्याने अल्प मानधनात शाळेत शिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांना वेळेत मानधन देण्याची जबाबदारी शासनाची आहे.
प्रतितास १०० रूपये करा
घड्याळी शिक्षकांना हायस्कूलकरीता ७२ रूपये तास मानधन दिले जाते. माध्यमिककरीता ५४ रूपये प्रतितास दिले जातात. महागाईचा विचार करता १०० रूपये प्रतितास मानधनात वाढ होण्याची आवश्यकता आहे. तशी वाढ व्हावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.
शिक्षकांनी उपाशीपोटी शिकवावे कसे ?
चार ते सहा महिन्यांपासून शिक्षकांना मानधन देण्यात आलेले नाही. घड्याळी तासिका शिक्षकांना शासनाकडून प्राप्त निधीतून शासनाकडून मानधन दिले जाते. त्यामुळे पाच ते सहा महिने या शिक्षकांनी उपाशीपोटी शिकवावे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा ? असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाले आहेत.
अंत पाहू नका
वेळेत मानधन मिळत नसल्याने प्रतीक्षा संपता संपेना, अशी अवस्था या शिक्षकांची आहे. प्रशासनाने आमच्या संयमाचा अंत पाहून नये, रखडलेले मानधन तातडीने द्यावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.
मालवण येथील भंडारी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणतात....
या राज्याच्या शिक्षण खात्यात, त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड गोंधळ आहे. भंडारी हायस्कूल इथे तासिका तत्वावर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या या गुरुजनांना आज ६-७ वर्षे झाली तरी अद्याप पगार नाही. त्यासाठी अनेकदा प्रस्ताव दिला आणि वारंवार पत्रव्यवहार केला तरीही यांचे मंजुरीचे पेपर पुढे सरकत नाहीत आणि यांना जाब विचारणारे कोणी नाही. एका बाजूला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे संबंधित कर्मचारी मात्र भरमसाट वेतन घेत आहेत. यात न्याय मिळावा आणि याना लवकर त्यांचे पैसे त्यांना मिळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.