अनुदानित शिक्षण संस्थांचे वेतन आता ‘आॅनलाईन’च
By admin | Published: April 29, 2015 10:07 PM2015-04-29T22:07:08+5:302015-04-30T00:28:34+5:30
जूनपासून होणार अंमलबजावणी
असगोली : राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालये, विद्यापीठ कर्मचारी अनुदानित संस्था, तंत्रनिकेतन, आयटीआयमधील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे जून २०१५ पासूनचे वेतन सरकारच्या खात्यातून वितरीत केले जाणार आहे. याबाबतचा अध्यादेश सरकारने ७ मार्च रोजी जारी केला आहे. त्यानुसार उच्च तंत्र व व्यावसायिक शिक्षण विभागातील प्राध्यापक, निदेशक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. वेतन देयके तयारी करण्यासाठी ‘सेवार्थ’ प्रणाली विकसीत केली आहे. शासनाने सर्व अनुदानित महाविद्यालये व विश्व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची याद मागवली आहे. ही सूची महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हरला जोडली जाणार आहे. सर्व्हरला कर्मचाऱ्याचे नव व नियुक्ती कोणत्या आधारावर झाली आहे, याची माहिती जोडली जाणार आहे. शासनाने जेवढ्या पदांना मान्यता दिली आहे तेवढीच पदे जोडली जाणार आहेत.
यापूर्वी अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांची वेतनाची माहिती कोषागार कार्यालयाला जात होती. त्यानंतर कोषागारामार्फत पगाराचा धनादेश स्टेट बँकेला मिळत होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध बँकातील खात्यात वेतन जमा करण्यात येत होेते. त्यामध्ये बराचवेळ खर्च होत होता. सरकारचा निधी बँक अधिकारी आपल्या मर्जीनुसार वापरत असत. त्यामुळे सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाच्या खात्यातून देण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)