चाळीस हजार शिक्षकांचे वेतन रखडले
By admin | Published: February 2, 2015 10:39 PM2015-02-02T22:39:02+5:302015-02-02T23:50:22+5:30
परवड कायमचीच : शिक्षकांचे प्रतिनिधी असूनही प्रश्न अनुत्तरीतच...
चिपळूण : राज्यातील चाळीस हजार शिक्षकांचे गेले दोन महिने रखडलेले वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी शिक्षक नेते, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.राज्याच्या शिक्षण क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे. अनेक शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या आहेत. भाजपा युती सरकारच्या अनास्थेमुळे शिक्षकांना फटका बसत आहे. प्राथमिक, माध्यमिक, सर्वशिक्षा अभियानच्या ४० हजार शिक्षकांना दोन महिने वेतन न मिळाल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यांच्यावर उपासमारीसारखी वेळ आली आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अच्छे दिनचे गाजर दाखवणाऱ्या सरकारच्या नावाने शिक्षकांचा शिमगा सुरु आहे, असेही जोशी यांनी सांगितले. राज्यातील अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थीसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न शासनाकडून अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळीच निर्णय झाला नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असेही जोशी यांनी सांगितले.शासनाने चुकीच्या धोरणामुळे शिक्षक अतिरिक्त ठरवले आहेत. त्यांचे वेतन रोखणे, योग्य शाळांमध्ये समायोजन न करणे चुकीचे आहे. अशा शिक्षकांचे वेतन आॅनलाईन पध्दतीने देण्याचे आदेश काढूनही त्याची पायमल्ली होत आहे. विधानपरिषदेत सात पदवीधर व सात शिक्षक आमदार आहेत. पण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत, असेही जोशी यांनी म्हटले आहे. शासनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसत असल्याने निर्णय बदलावा व वेतनाचा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)