सिंधुदुर्ग : औषधे लावून फळांची विक्री सुरू, सावंतवाडीतील प्रकार : भोगटेकडून कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:49 PM2018-09-14T16:49:20+5:302018-09-14T16:55:26+5:30
सावंतवाडी बाजारपेठेत केमिकलद्वारे पाठविली जाणारी केळी तसेच फळांबाबत लोकमतने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत येथील सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या केमिकलचा नायनाट करुन संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी बाजारपेठेत केमिकलद्वारे पाठविली जाणारी केळी तसेच फळांबाबत लोकमतने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत येथील सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या केमिकलचा नायनाट करुन संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
सावंतवाडी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होणारी केळी ही नैसर्गिकरित्या न पिकविता ती केमिकलव्दारे पिकवून विकली जातात. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते.
दरम्यान, पालिका प्रशासनानेही याची दखल घेतली असून माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनीही या प्रकाराबाबत आवाज उठवत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्न औषध प्रशासन व पोलीस अधीक्षक, नगरपालिका प्रशासन यांच्याजवळ निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात येत्या गणेश उत्सव काळात केमिकलयुक्त केळी व फळांचा सर्रास वापर होऊ शकतो.
यात नागरिकांची फसवणूक होऊन अशा फळांपासून भयंकर रोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे अशा केमिकलद्वारे केळीवर प्रक्रिया करणाऱ्या विक्रेत्यांची शोध मोहीम राबवून कारवाई करण्यात यावी तसेच नागरिकांनीही अशी केळी खरेदीवर बहिष्कार घालावा. शोध मोहीम राबविताना योग्य यंत्रणा वापरण्यात यावी, अशी मागणीही भोगटे यांनी केली आहे.