ठाण्यात चोरलेल्या दुचाकींची विक्री
By admin | Published: August 9, 2016 10:56 PM2016-08-09T22:56:00+5:302016-08-09T23:54:40+5:30
वीस गाड्या जप्त : आचऱ्यातील एजंटाकडून केले जात होते व्यवहार
आचरा : मुंबई आणि ठाणे येथून दुचाकी चोरून त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्री करणाऱ्या सूत्रधारास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करीत या भागात २० दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. विकण्यात आलेल्या २० दुचाकींपैकी १५ दुचाकी आचरा पंचक्रोशीत विकल्या गेल्याची माहिती उघड होत आहे. मात्र, याबाबत आचरा पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणातील चोरट्यांचे रॅकेट उघड होणार आहे. या दुचाकी मालवण, कणकवली, देवगड परिसरात विकण्यात आल्या होत्या. ठाण्यात बारमध्ये काम करणारा चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकी विकत असे. आचऱ्यातील स्थानिक एजंटामार्फत तो जिल्ह्यात दुचाकीची विक्री करत असल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)
दुचाकी कमी किमतीत विकण्याचा व्यवसाय
ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती ही पनवेल येथे राहत असे व ठाणे येथील एका बारमध्ये अटेंडन्ट म्हणून काम करत होती. काही चोरटे मौजमजा करण्यासाठी बारमध्ये येत असत. पैसे देण्याची वेळ झाली की, ते पैसे नसल्याचा बहाणा करीत. चोरलेली दुचाकी त्याच्याकडे ठेवत असत आणि पैसे नंतर देऊ असे त्याला सांगत. याच व्यक्तीने पैसे कमविण्याच्या लालसेपोटी या दुचाकी कमी किमतीत ग्रामीण भागात आणून विकण्याचा धंदा सुरू केला.
तपासानंतर माहिती : पोलिस आचरा गावातील एका व्यक्तीची या चोरीच्या दुचाकी विकणाऱ्याशी ओळख झाली. तो आचऱ्यातील एजंटाला दुचाकी आणून देत असे. हा एजंट आचरा, कणकवली, मालवण, देवगड परिसरात या दुचाकींसाठी ग्राहक मिळवून देत असे. या प्रकरणाचा ठाणे पोलिस तपास करीत असून त्यानंतरच माहिती देण्यात येईल, असे आचरा पोलिसांनी सांगितले.