सरसकट नुकसान भरपाई मिळावी, साळगावातील शेतकऱ्यांची आशिष शेलारांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:26 PM2019-11-02T13:26:36+5:302019-11-02T13:31:42+5:30
अवकाळी पाऊस आणि झालेल्या वादळामुळे भातशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे
कुडाळ - अवकाळी पाऊस आणि झालेल्या वादळामुळे भातशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी साळगाव येथील शेतकऱ्यांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याजवळ केली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आशिष शेलार यांनी कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल असे त्यानी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार नितेश राणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात पडलेल्या संततधार पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाच्या कोकणातील शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार नुकसानीच्या पाहणीसाठी दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी कुडाळ येथून केली. त्यानंतर सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली असा दौरा ते करणार आहेत.
‘क्यार’ वादळाचा याआधी काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आल्याने किनारपट्टीलगतच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. तसेच पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. किनारपट्टीच्या भागात समुद्राच्या उधाणाचा फटका आचरा पिरावाडी, जामडूल बेटाला देखील बसला. खाडी किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी देखील दूषित झालंय, तर काही मच्छिमारांच्या जाळीचेही नुकसान झाले.
मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांतून होत आहे. सिंधुदुर्गातील प्रमुख पीक म्हणून भातशेती केली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर ही भातशेती केली जाते. अनेक शेतकरी या भातशेतीवर अवलंबून आहेत. आता भातशेती जवळपास पूर्ण परिपक्व असून त्याची कापणी होणे गरजेचे असतानाच गेले काही दिवस मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात 10 टक्केही भातकापणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.