Sindhudurg: मान्सूनपूर्व पावसाने साळिस्ते गाव तीन दिवस अंधारात, ग्रामस्थांची वीज कार्यालयात धाव
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 22, 2024 06:37 PM2024-05-22T18:37:58+5:302024-05-22T18:38:20+5:30
वीज वितरण कार्यालयातून ग्रामस्थ चर्चा करून बाहेर पडताच काही वेळातच गावात पुन्हा वीज पुरवठा सुरळीत
नीकेत पावसकर
तळेरे : सध्या सायंकाळी पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वत्र वीज समस्या जाणवत आहे. कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावात गेले तीन दिवस वीजच गायब झाली असून, संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी तळेरे येथील वीज कार्यालयात धडक दिली आणि वीज समस्येबाबत विचारणा केली. मात्र, काही काळातच पर्यायीव्यवस्था करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, गेले अनेक दिवस वळीव पावसामुळे सर्वत्र नुकसान होत आहे, तर अनेक ठिकाणी वीज समस्या जाणवत आहे. साळिस्ते गावातही पावसामुळे वीज समस्या निर्माण झाली. त्यामुळे गेले तीन दिवस गावात वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे सार्वजनिक नळाचे पाणी येऊ शकलेले नाही. शिवाय, पाऊस जरी पडत असला तरीदेखील उन्हाचे चटके कमी झालेले नाहीत. वीज नसल्याने अनेक गैरसोय होऊ लागली.
या समस्येबाबत संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी तळेरे येथील वीज वितरण कार्यालयात भेट देऊन याबाबत विचारणा केली. यावेळी महावितरण विभागाचे अभियंते पाटील व उपअभियंता गावकर उपस्थित होते. साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांनी वीज नसल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय, तसेच सोसावे लागणारे हाल मांडले आणि साळिस्ते गावाला पूर्वीप्रमाणेच खारेपाटणवरून वीजपुरवठा करण्यात यावा, संपूर्ण गावातील विद्युत पोल, डीपी, लाइन यांचा पावसाळ्यात वीज समस्या होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात यावी. याबाबत चर्चा करण्यात आली.
महावितरण अभियंते पाटील व गावकर यांनी सर्व समस्यांची हमी घेतली व लवकरच साळिस्ते गावातील वीज समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, माजी सरपंच उदय बारस्कर, माजी सरपंच अनंत बारस्कर, माजी उपसरपंच बाळा पाटील, मंगेश कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा विधानसभा क्षेत्र सोशल मीडियाप्रमुख मयूरेश लिंगायत, पप्या मेस्री, बबन कांजीर, श्रीधर कांबळे, जगदीश कुलकर्णी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
अवघ्या काही वेळात वीज
तळेरे वीज वितरण कार्यालयातून ग्रामस्थ चर्चा करून बाहेर पडताच काही वेळातच साळिस्ते गावात पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाला. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले.