सायली पारकरचा विज्ञान प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:48+5:302015-12-15T00:39:05+5:30
रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रतिनिधीत्व : पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची झेप
खालगाव : डिसेंबरअखेर चंदीगड येथे होणाऱ्या २३ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये सादर केल्या जाणाऱ्या निवडक प्रकल्पांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली पारकर, भक्ती पटेल, अफरा पटेकर आणि स्नेहा सलपे यांच्या प्रकल्पाची निवड झाली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान या प्रकल्पाची गटप्रमुख सायली पारकर हिला मिळाला आहे.या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या प्रतिकृतीतून वाहन चालकांना आपल्या वाहनाची प्रदूषण पातळी ठरवून ती कशी संतुलीत करता येईल हे प्रत्यक्ष प्रयोगाने दाखवून दिले आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत राबविला जाणारा हा उपक्रम सन १९९८ पासून यशस्वीपणे सुरु आहे. रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्था ही सन २००५पासून या उपक्रमामध्ये सक्रियपणे कार्यरत आहे.शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विज्ञान मंडळाच्या सहकार्याने दि. १८ आॅक्टोबर २०१५ रोजी रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेमधून विभागासाठी निवडलेल्या ५ प्रकल्पांमधून श्रीमती पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय आणि एम. एस. नाईक हायस्कूल, रत्नागिरी यांच्या प्रकल्पांची निवड राज्यस्तरासाठी झाली होती.वसुंधरा विज्ञान केंद्र, कुडाळ येथे दि. ५ व ६ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेमध्ये सादर झालेल्या वरवडे हायस्कूलच्या ‘दुचाकी वाहनांच्या प्रदूषणावरील प्रकल्पाची’ राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी केलेल्या या प्रकल्पाचे कौतुक करण्यात येत आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या विद्यार्थिनींच्या प्रकल्पाची निवड झाल्याने गटप्रमुख सायली पारकर हिचे बालविज्ञान परिषद जिल्हा समन्वयक संजय मुळ्ये व आश्रय सेवा संस्थेचे अध्यक्ष अरुण मुळ्ये, विज्ञान मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर धोत्रे, माजी अध्यक्ष जयवंत विचारे यांनी अभिनंदन केले आहे व पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (वार्ताहर)
भारत सरकारतर्फे बालविज्ञान परिषदेचे आयोजन.
दुचाकी वाहनांच्या प्रदूषणावरील प्रकल्प.
डिसेंबरअखेर चंदीगड येथे होणार बालविज्ञान परिषद.
आश्रय सेवा, रत्नागिरी या उपक्रमात कार्यरत.
राज्यस्तरावर रत्नागिरीच्या दोन प्रतिकृतींची निवड़
सायली पारकर प्रकल्पाची गटप्रमुख.
विद्यार्थिनींचे कौतुक.