खाकी वर्दीतल्या देवाला सलाम रं; गजरातून कार्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:20 PM2018-09-30T23:20:14+5:302018-09-30T23:20:18+5:30

Salute the khaki god; Gaurav's work | खाकी वर्दीतल्या देवाला सलाम रं; गजरातून कार्याचा गौरव

खाकी वर्दीतल्या देवाला सलाम रं; गजरातून कार्याचा गौरव

Next

सिद्धेश आचरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : खाकी वर्दीशी इमान असलेल्या पोलिसांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोलिसांना साधा कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत नाही. मात्र, याच पोलिसांच्या ‘खाकी’मध्ये बुवा समीर कदम यांना देवाचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या जीवनावर हरिनामातून प्रकाश टाकत भजन क्षेत्रात घातलेल्या नव्या पायंड्याचे स्वागत होत आहे.
मालवण पोलीस वसाहतीतील सार्वजनिक गणेशोत्सव गेले १८ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
गणेशोत्सवानिमित्त पोलीस वसाहत व कर्मचारी यांच्यावतीने दरवर्षी डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला जातो.
यावर्षी पोखरण (ता. कुडाळ) येथील श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाचे बुवा समीर कदम आणि बापर्डे (ता. देवगड) येथील श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप नाईकधुरे यांच्यात हा डबलबारी सामना संगीत मैफिल आणि बतावणीत चांगलाच रंगला. त्यात गुरू-शिष्य असलेल्या गजानन देसाई आणि योगेश सामंत या सुप्रसिद्ध पखवाज वादकांची साथ लाभल्याने डबलबारीच्या सांगतेपर्यंत दर्दी रसिक दाद देत होते.
बुवा कदम व बुवा नाईकधुरे यांनी पोलिसांच्या यशस्वी कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढताना त्यांच्या देशसेवेच्या कार्यालाही आपल्या भजनातून सलाम केला.
बुवा संदीप नाईकधुरे यांनी गोड आवाजात भजनाला प्रारंभ केला. नाईकधुरे यांनी पोलीस हे साक्षात देवाचा अवतार आहेत. पोलिसांमुळे समाजात ताठ मानेने फिरू शकतो. अनेकवेळा पोलीस जीव धोक्यात घालून गुन्हेगारांना गजाआड करतात. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना त्यांनी सलाम केला. तर बुवा समीर कदम यांनीही पोलीस दलाचे विशेष कौतुक करताना ‘एक गाव एक पोलीस’ या अभिनव उपक्रमाबाबत भजनातून जनजागृती केली.
यावेळी विनोदाच्या माध्यमातून त्यांनी एक-दोन वेळा शाब्दिक चिमटेदेखील काढले.
तुमच्याआमच्या भल्यासाठी...
पोलीस हा जनतेसाठी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ सेवा बजावत असतो. पोलीस दलात रुजू झाल्यापासून तो आपला देह देशाला समर्पित करतो. अत्याचार, खून, हाणामाºया, आंदोलने, जाळपोळ, दंगल यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलीस बांधव २४ तास गुंतलेले असतात. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असते. मात्र, त्याची वाहवा होताना दिसत नाही. याबाबत बुवा समीर कदम यांनी पोलिसांचा जीवनपट आपल्या गजरातून सादर करताना त्यांच्या कार्याची महती रसिकांपर्यंत पोहोचविली. ‘तुमच्या आमच्या भल्यासाठी, करतो हा काम रं! या या गर्दीतल्या, या खाकी वर्दीतल्या देवाला सलाम रं’ अशा शब्दांत पोलिसांच्या कार्याचा गौरव करताना लाख लाख सलाम केला.

‘लोकमत’मधून भजन सांप्रदायावर सकारात्मक लिखाण केले जाते. हरिनामरुपी सेवेतून समाजप्रबोधन करण्याचा भजनी बुवांचा दृष्टिकोन लोकमतने कायम हेरला असून त्याचे चांगले वार्तांकन केले जाते. डबलबारी भजनात फोफावलेल्या अश्लीलतेला लोकमतने वाचा फोडली, असे बुवा संदीप नाईकधुरे व बुवा समीर कदम यांनी सांगत ‘लोकमत’चे विशेष कौतुक केले.

Web Title: Salute the khaki god; Gaurav's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.