शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना कणकवलीत मानवंदना, पोलिसांकडून सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:44 PM2018-08-21T16:44:04+5:302018-08-21T16:44:04+5:30
सडुरे गावचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ प्रकाश राणे(रावराणे) यांचा अस्थिकलश वैभववाडीहून फोंडा मार्गे कणकवलीत दाखल झाला. जानवली नदी पुलावर कणकवलीवासीयांनी भावपूर्ण वातावरणात अस्थीकलशाचे स्वागत केले.
कणकवली : सडुरे गावचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ प्रकाश राणे(रावराणे) यांचा अस्थिकलश वैभववाडीहून फोंडा मार्गे कणकवलीत दाखल झाला.
जानवली नदी पुलावर कणकवलीवासीयांनी भावपूर्ण वातावरणात अस्थीकलशाचे स्वागत केले.त्यानंतर पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातून बाजारपेठ मार्गे तेलीआळीतून कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर हा कलश दाखल होताच 'मेजर कौस्तुभ राणे अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी पोलिस दलाने मानवंदनाही दिली.
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे चुलते विजय रावराणे अस्थिकलश घेऊन मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कणकवलीत दाखल झाले. त्यानंतर कणकवली शहरातून कणकवली महाविद्यालयापर्यन्त अस्थिकलश यात्रा काढ़ण्यात आली.
कणकवली शहरातून मंगळवारी काढण्यात आलेल्या शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलश यात्रेत बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले होते.
कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर आमदार नीतेश राणे , कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , कृषि उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती तुळशीदास रावराणे यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
मेजर कौस्तुभ राणे अमर रहे', 'जब तक सूरज चाँद रहेगा; तब तक शहीद कौस्तुभ राणे नाम रहेगा' अशा घोषणा देत फुलांच्या गालिचावरुन आणलेला वाहनावरील अस्थिकलश प्रकाश सावंत यांनी एच पी.सी.एल.सभागृहात सन्मानपूर्वक नेऊन ठेवला. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करुन सलामी दिली. त्यानंतर उपस्थितानी अस्थिकलशाचे दर्शन घेतले व आदरांजली वाहिली.
कणकवली महाविद्यालयाच्या एच पी सी एल सभागृहात शहिद मेजर कौस्तुभ राणे यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम , तहसीलदार संजय पावसकर , नगराध्यक्ष समीर नलावडे , कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, अनिरुध्द शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सुलेखा राणे, संदीप सावंत, डॉ.तुळशीराम रावराणे, विनायक उर्फ़ बाळू मेस्त्री, विनायक सापळे, स्वाती राणे ,रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र मुरकर, संतोष कांबळे, दादा कुडतरकर, माजी सैनिक नाना पांगम, सुशील सावंत, भाई परब, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, , महेंद्र सांब्रेकर, महेश सावंत, सूर्यकांत वारंग, संदेश सावंत -पटेल , राजन चिके, प्रताप भोसले, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री , सुभाष राणे, निवृत्त सुभेदार अशोक कदम , निवृत्त सैनिक नाना पांगम, धनंजय सावंत, अर्जुन राणे, महानंद चव्हाण , अनूप वारंग ,सादिक कुडाळकर , नगरवाचनालयाचे अध्यक्ष डी.बी.तानवडे यांच्यासह एनसीसी कॅडेट तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्यावतीने पुष्पांजली वाहण्यात आली .
त्यानंतर राष्ट्रगीत गायनाने या आदरांजली कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास अस्थिकलश कसालच्या दिशेने नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाला.
शहीद मेजर राणे भारतमातेच्या गळ्यातील ताईत !
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी अत्यंत कमी वयात कर्तुत्व गाजवले आहे. त्यांनी देशाचे संरक्षण करताना सिंधुदुर्गचे नाव देशाशी जोडले आहे. मेजर कौस्तुभ राणे म्हणजे भारतमातेच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यानी देशसेवेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. अशा शब्दात पोलीस निरीक्षक तथा माजी सैनिक शिवाजी कोळी यांनी श्रद्धांजली वाहिली.
यूरेखा क्लबकडून सैनिकांसाठी राखी !
यूरेखा सायन्स क्लब कडून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना राखी पाठविण्यात येणार आहे. कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल.सभागृहात त्याचा कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षाला भेट देवून नागरिकांनी सैनिकांसाठी संदेश लिहावा असे आवाहन यावेळी करण्यात येत होते.