समाजसेवेचा वसा नाईक कुटुंबियांनी जोपासला : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 05:12 PM2019-06-22T17:12:22+5:302019-06-22T17:14:42+5:30
कणकवली : श्रीधर नाईक यांनी राजकारणातून नव्हे तर समाजकारणातून आपला वेगळा ठसा समाजमनावर उमठवला होता. अल्पवयात त्यांनी वैचारिक श्रीमंती ...
कणकवली : श्रीधर नाईक यांनी राजकारणातून नव्हे तर समाजकारणातून आपला वेगळा ठसा समाजमनावर उमठवला होता. अल्पवयात त्यांनी वैचारिक श्रीमंती कमावली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांची राजकीय हत्या झाली. परंतु त्यांचा समाजसेवेचा वसा नाईक कुटुंबाने आजही जोपासला आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल.सभागृहात शनिवारी श्रीधर नाईक स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिर आणि शेतकरी मेळावाही घेण्यात आला. त्याचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक,भाजपा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, श्रीधर नाईक यांचे सुपुत्र नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक, शिवसेना महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, नीलम पालव, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, प्रदीप सावंत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, डॉ.चंद्रकांत राणे, डॉ. तुळशीराम रावराणे, डॉ . गीते, दादा कुडतरकर, प्रतीक्षा साटम, तेजल लिंग्रज, शैलेश भोगले, शेखर राणे, सचिन सावंत, राजू शेट्ये, विलास साळसकर, सुजित जाधव, गीतेश कडू, सुदाम तेली, छोटू पारकर, प्रथमेश सावंत , सतीश नाईक , भास्कर राणे, बाळू मेस्त्री, यांच्यासह श्रीधर नाईक प्रेमी उपस्थित होते.
यावेळी विनायक राऊत म्हणाले, विजय नाईक यांनीही आपला व्यवसाय सांभाळत समाज सेवा केली. विजय नाईक व श्रीधर नाईक या दोघा बंधूनी समाजसेवेच्या माध्यमातून एक आदर्श समाजासमोर उभा केला . त्याचे अनुकरण नाईक कुटुंबियांच्या पुढील पिढीने केले आणि जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आमदार वैभव नाईक म्हणाले, गेली २८ वर्षे जनतेचा आधार नाईक कुटुंबियांना लाभला आहे. हा आधारच आम्हाला समाजसेवेची उर्मी देतो आणि त्यातून स्फुर्ती मिळते. श्रीधर नाईक वयाच्या १८ व्या वर्षापासून स्वतः रक्तदान करत होते. विविध माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असायचे. तसे कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
येथे आयोजित करण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक भविष्यात मोठे लेखक आणि चित्रकार बनतील. श्रीधर नाईक यांनी आम्हाला वसा दिलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या दिशेनेच नाईक कुटुंबीय यापुढेही वाटचाल करतील.
संदेश पारकर म्हणाले, लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांनी श्रीधर नाईक यांची हत्या केली. ही हत्या स्वतःचे अस्तित्व नाहीसे होईल या भीतीने त्यांनी केली होती. ही सिंधुदुर्गातील पहिली राजकीय हत्या होती. श्रीधर नाईक समाजसेवेतील अग्रणी नाव होते. त्यांच्या हत्येने नाईक कुटुंबियांइतकेच समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे. खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी होत श्रीधर नाईक यांची हत्या करणारी जुलमी राजकीय शक्ती संपवली आहे. श्रीधर नाईक यांची स्मृती समाजाला विधायक दिशा देणारी आहे.
अतुल रावराणे म्हणाले, आपल्या समाजसेवेतून श्रीधर नाईक यांच्या स्मृती नाईक कुटुंबीयांनी जागृत ठेवल्या आहेत. श्रीधर नाईक यांचे योगदान कणकवलीतच नव्हे तर जिल्ह्यातील जनतेच्या कायमच स्मरणात राहील.असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित इतर मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीधर नाईक फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र , सिंधदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर तालुक्यातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना चांदीचे मेडल देऊन यावेळी गौरविण्यात आले. तसेच दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या दिव्या राणेचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते चांदीचे मेडल, शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला .