सामंत यांनी प्रतिमा तपासावी
By admin | Published: June 5, 2016 10:30 PM2016-06-05T22:30:24+5:302016-06-06T00:52:44+5:30
बाबा मोंडकर : राजकीय नेत्यांना टार्गेट करू नये
मालवण : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांना ‘विषारी साप’ असे म्हणणे निंदनीय आहे. राजन तेली हे आपले गुरू आहे, असे त्यावेळी भाषणातून दत्ता सामंत यांनी सांगितले होते. त्यामुळे गुरूला विषारी साप संबोधणे हास्यास्पद आहे. सामंत यांनी भाजपच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा पक्ष संघटनावाढीसाठी प्रयत्न करावेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेली जिल्ह्याची जबाबदारी सांभाळताना इतर राजकीय नेत्यांना टार्गेट करू नये. आधी त्यांनी स्वत:ची प्रतिमा तपासून पहावी, अशी टीका भाजप मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली आहे.येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी मोंडकर यांनी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी सामंत यांनी तेली यांना ‘विषारी साप’ म्हटले होते. या विधानाचा मोंडकर यांनी चांगलाच समाचार घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत सामंत यांच्या घुमडे गावासह अन्य काही प्रमुख केंद्रांवर काँग्रेस पिछाडीवर होती. याचा अभ्यास करून सामंत यांनी टीका करावी. नारायण राणे यांच्या प्रचाराला सामंत यांनी किती वेळ दिला याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असेही मोंडकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा चिटणीस आप्पा लुडबे, शहर अध्यक्ष बबलू राऊत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सी-वर्ल्ड सत्यात उतरविणार
मोंडकर म्हणाले, भाजप सरकार हे स्वप्ने दाखवत नाही तर स्वप्ने सत्यात उतरवते. गेल्या दोन वर्षांत केंद्रात व राज्य सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे निर्णय घेतले आहे. महत्त्वाकांक्षी सी-वर्ल्ड प्रकल्प साकारण्याबाबत भाजपा सरकारने गतिमान हालचाली सुरूकेल्या आहेत. काही भूधारकांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या काही कालावधीत सी-वर्ल्ड स्वप्न राहणार नसून सत्यात उतरणार आहे. येणाऱ्या निवडणूक काळातही भाजप जोमाने काम करणार असून, अपेक्षित निकालही प्राप्त होईल.