भास्कर जाधव यांना सामंत यांचे प्रतिआव्हान
By Admin | Published: July 1, 2016 10:26 PM2016-07-01T22:26:30+5:302016-07-01T23:42:39+5:30
विधानसभा : जाधव यांच्यासमोर कोठेही लढण्याची तयारी
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार, असे सांगून आव्हान देणाऱ्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांना आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी प्रतिआव्हान दिले. रत्नागिरी किंवा गुहागरच काय, राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे.
रत्नागिरीतून मीच काय, सेनेच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवली तरी जाधव यांचा पराभव निश्चित आहे, असेही सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ठणकावले.
रत्नागिरी माळनाका येथे गुरुवारी (दि. ३०) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता, त्यावेळी आमदार जाधव यांनी सामंत यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर चौफेर टीकाही केली होती. आघाडीच्या काळात झालेली कामे आपण केल्याचे सांगून आमदार सामंत श्रेय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याबाबत बोलताना आमदार सामंत म्हणाले की, मी राष्ट्रवादीत आमदार असताना आघाडीच्या काळात येथे विकासकामे झाली हे मान्य आहे. परंतु, गद्दारीचा विषय आता जुना झाला आहे, हे कोणीतरी जाधव यांना सांगण्याची गरज आहे. मेळाव्याच्यावेळी व्यासपीठावर असलेल्यांपैकी एक-दोघे सोडले तर बाकीच्या लोकांची निष्ठा जाधव यांनी तपासून बघायला हवी. गद्दारीचा आरोप माझ्यावर करताना मेळाव्यात व्यासपीठावर असलेल्यांनी किती वेळा गद्दारी केली, याचा इतिहास प्रथम जाधव यांनी तपासून घ्यावा, असेही सामंत म्हणाले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील १०९ पैकी ९४ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. ११ ग्रामपंचायती भाजपकडे, दोन गाव पॅनेलकडे, एक कॉँग्रेसकडे, तर रत्नागिरी तालुक्यात बळ वाढत असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे केवळ एक ग्रामपंचायत आहे. जाधव यांना त्यांच्याच पक्षातील लोक चुकीची माहिती देत आहेत. चुकीच्या माहितीवर बोलणे राष्ट्रवादीतील जबाबदार व्यक्तीला कितपत शोभते, हा खरा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
संधिसाधूंकडून जाधव यांचा ढालीसारखा वापर
जाधव हे प्रामाणिक आहेत, तसेच भावनाशीलही आहेत. त्यामुळे त्यांना कोणी काही सांगितले की तेच सत्य मानून भावनेच्या भरात ते बेधडक बोलत जातात. त्याचाच फायदा त्यांच्या पक्षात त्यांच्याबरोबर वावरणारे लोक घेत आहेत. स्थानिक नेते जाधव यांना ढाल म्हणून पुढे करीत स्वत:चा उद्देश साध्य करून घेत आहेत. जाधव यांच्या मागेपुढे फिरत आपण पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, असे म्हणणाऱ्यांनीच अनेकदा गद्दारी केल्यामुळे अशा संधिसाधूंसाठी ढाल बनायचे की नाही, हे आता जाधव यांनीच ठरवावे, असा टोलाही आमदार सामंत यांनी लगावला.