फोंडा चेकपोस्ट स्थलांतरित करण्याचे सामंत यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:19 PM2020-04-16T17:19:42+5:302020-04-16T17:20:57+5:30
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली. आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी कणकवली तहसील कार्यालयात या विषयी चर्चा केली.
कणकवली : फोंडाघाट येथील पोलीस चेकपोस्ट हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ये-जा करताना नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे चेकपोस्ट स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिकांमधून होत होती. त्याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रायोगिक तत्त्वावर चेकपोस्ट स्थलांतरित करून ते घाटपायथ्याला घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
फोंडाघाट येथील पोलीस चेकपोस्टच्या पलीकडील भागात गावातील पाच वाड्या येतात. गांगोवाडी, बोकलभाटले, खैराटवाडी, बौध्दवाडी व पिंपळवाडी येथे सुमारे ४ हजार लोकसंख्या असून या नागरिकांना फोंडा बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय, रुग्णालय व इतर कामांसाठी ये-जा करताना गैरसोय सहन करावी लागते. हे चेकपोस्ट गावच्या सीमेवर घाटपायथ्याला स्थलांतरित करावे अशी मागणी फोंडाघाट ग्रामपंचायतकडून कणकवली तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती.
तहसीलदारांनी तसे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यानंतर याविषयी माजी जिल्हा परिषद सभापती संदेश पटेल यांनी आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व युवा नेते संदेश पारकर यांना माहिती दिली होती. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली. आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी कणकवली तहसील कार्यालयात या विषयी चर्चा केली.