‘संभाजी’ चौकाला ‘बॅनर’चा विळखा

By admin | Published: July 10, 2016 11:50 PM2016-07-10T23:50:30+5:302016-07-10T23:50:30+5:30

नागरिकांना त्रास : नगरपंचायतीचे धोरण कागदावरच; अपघाताची शक्यता

'Sambhaji' Chowk 'Banner' is detected | ‘संभाजी’ चौकाला ‘बॅनर’चा विळखा

‘संभाजी’ चौकाला ‘बॅनर’चा विळखा

Next

वैभववाडी : बॅनर, होर्डिंग्जमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने धोरण ठरविले खरे! परंतु, संभाजी चौकाकडे पाहिल्यावर नगरपंचायतीचे ‘बॅनर धोरण’ कागदावरच राहिल्याचा प्रत्यय सध्या नागरिकांना येत आहे. सुशोभित केलेल्या चौकाला बॅनरचा विळखा पडला असल्याने ‘संभाजी’ चौकाऐवजी ‘बॅनर’ चौक म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले असून, या बॅनर्समुळे चौकात अपघाताची शक्यता वाढली आहे.
नगरपंचायतीचा कारभार हाती घेताना नव्या कारभाऱ्यांनी कालमर्यादा ठरवून आकारमानानुसार कर भरुन घेऊन बॅनर लावण्याची परवानगी द्यावी. तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा जागी बॅनरला परवानगी देऊ नये. बॅनर लावणाऱ्यांनी निर्धारित वेळेत ते काढून नेले नाहीत तर संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येईल, अशा स्वरूपाचे धोरण निश्चित करण्यात आले होते. परंतु, सुरुवातीपासूनच या धोरणाची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही.
चौकातील पूर्वीच्या कठड्याच्या जागी नवीन कठडा उभारुन उंची वाढविण्यात आली. तसेच काही प्रमाणात त्याचे सुशोभिकरणही झाले. मात्र, त्यानंतर चौकाचा कठडा बॅनरसाठी अतिशय मोक्याचे ठिकाण बनला आहे.
मध्यंतरी संभाजी चौकात महाराणा प्रतापसिंहांचा पुतळा उभारण्यावरुन उठलेल्या वादळानंतर या चौकात बॅनर लावूच नयेत, अशी भूमिका घेतली गेली होती. मात्र, तीही तकलादू ठरली. सध्या संपूर्ण संभाजी चौकाला चहुबाजूंनी बॅनरचा विळखा पडलेला दिसून येतो. या बॅनरमधून नगरपंचायतीला कर किती मिळाला. हा मुद्दा निराळाच आहे.
विजयदुर्ग - कोल्हापूर व फोंडा -उंबर्डे या मार्गांचा संभाजी चौक दुभाजक आहे. हे दोन्ही रस्ते सतत वर्दळीचे आहेत. चौकातील बॅनरमुळे पलिकडच्या रस्त्यावरील वाहनांचा मुळीच अंदाज येत नाही. दोन रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या चौकात बॅनरला परवानगी देताना नगरपंचायतीने नागरिकांच्या आणि वाहनांच्याही सुरक्षिततेचा विचार करायला हवा. परंतु, संभाजी चौकातील सद्यस्थिती पाहता नगरपंचायतीचे बॅनर विषयक धोरण कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच रिलायन्सच्या केबलसाठी खोदलेल्या चराचा अडथळा आहेच. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना चौकातील बॅनरचा नाहक त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
हा नगरपंचायतीचा निष्काळजीपणा
बॅनरला परवानगी देताना कालमर्यादेची अट पाळणे ही जशी बॅनर लावणाऱ्यांची जबाबदारी आहे. तशीच ती मुदतीनंतर काढून टाकण्याची जबाबदारी नगरपंचायतीचीही आहे. संभाजी चौकात सध्या शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश, वाढदिवसांच्या शुभेच्छा, गुणवंतांचे अभिनंदन, मोर्चे, जयंत्या आदींचे बॅनर लागलेले आहेत. त्यातील बहुतांश बॅनर कालबाह्य झालेले आहेत. तरीही या बॅनर्सचा संभाजी चौकाला विळखा कायम आहे. मात्र, यातून नगरपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने चौकात लागणाऱ्या बॅनरवर निर्बंध घातले नाहीत; तर कालांतराने संभाजी चौकाची ‘बॅनर चौक’ अशी नवी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: 'Sambhaji' Chowk 'Banner' is detected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.