संभाजी चौकात झेंडा फ डकतच राहणार
By admin | Published: April 1, 2016 10:55 PM2016-04-01T22:55:46+5:302016-04-02T00:05:22+5:30
स्वराज्य संघटना : सावंतवाडी नगरपरिषदेत ‘बेवारस’ पक्षाची सत्ता
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवबंधन बांधून भगवा हाती घेतलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेतील नगराध्यक्षांनी सावंतवाडी नगरपरिषद कोणत्या राजकीय पक्षाची आहे, हे जाहीर न केल्याने ती बेवारसच असल्याचे सिद्ध झाले आहे. नगराध्यक्षांनी नगरपरिषद कोणत्या पक्षाची हे जाहीर न केल्यास स्वराज्य संघटनेतर्फे सावंतवाडी नगरपरिषद बेवारस असल्याचे जाहीर करण्यात येईल, असे पत्रक स्वराज्य संघटनेतर्फे देण्यात आले आहे.
सावंतवाडी शहर हे संस्थानकालीन ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. शहराचा इतिहास पाहता संस्थानकालीन आपला झेंडा भगवा झेंडा म्हणूनच फडकविलेला आहे आणि आजही तो तसाच फडकवत आहे. म्हणून या भगव्या झेंड्याला शहरातील कोणत्याही जाती-धर्माचा विरोध नाही. पण झेंड्याच्या छत्रछायेखाली जी मंडळी राजकारणात मोठी झाली, त्यांनाच शहरातील जातीय सलोखा बिघडण्यासाठी संभाजी चौक येथील सन्मानाने फडकणारा भगवा झेंडा उतरविण्याची दुर्बुध्दी सुचलेली आले.
संभाजी चौक हे नाव शिवजयंती दिवशी त्याच भागातील शिवप्रेमींनी जाहीर केल्याने शासकीय सोपस्कार पूर्ण करण्याबाबत सहा महिन्यांपूर्वीच सनदशीर मार्गाने पत्र दिले आहे. त्यामुळे रहिवाशांची इच्छा असताना पालिकेच्या डोळ्यात भगवा झेंडा का खुपत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. याच ठिकाणी सिस्टर डोराथी पार्कचे नाव असलेला फलक कोणीही काढलेला नाही. त्यामुळे संस्थानकाळापासून गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या सावंतवाडीवासीयांमध्ये जातीवाद निर्माण करण्याचाच हा प्रयत्न असण्याची शक्यता आहे आणि याविरोधात स्वराज्य संघटना कायमच उभी ठाकली आहे. जिथे जिथे भगव्याचा अपमान होईल, तिथे तिथे स्वराज्य संघटना स्वाभिमानाने सर्व तयारीनिशी उतरणार आहे.
यावेळी अमोल साटेलकर, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, अॅड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, रवींद्र वेंगुर्लेकर, सोमनाथ गावडे, संदीप धुरी, सुशांत पाटणकर आदी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रसिद्धीपत्रकावर सह्या
आहेत. (वार्ताहर)
नगरपरिषद प्रशासनाचे गैरकृत्य
संभाजी चौकात फडकविलेला झेंडा काढण्यासाठी कुणीही उताविळ होऊ नये. महाराष्ट्रात कोठेही भगवा झेंडा फडकविला आणि तो उतरावयाचा असल्यास शासकीय अध्यादेशाप्रमाणे जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊनच त्यांच्या रितसर परवानगीनेच झेंडा उतरवावा लागतो. पण याचा अभ्यास नसलेली मंडळी नगरपरिषदेच्या प्रशासनातून गैरकृत्य करीत आहे.
संभाजी चौकामध्ये फडकाविण्यात आलेला भगवा ध्वज हा विनाविरोध बसविण्यात आला आहे. तरीही काही विघ्नसंतोषी लोक तो झेंडा म्हणजे अतिक्रमण असल्याचा भास निर्माण करत आहे. वास्तविक पाहता, हा झेंडा फडकविण्यात स्थानिकांच्या भावनांची कदर करणे गरजेचे आहे.