१८ रुग्णांचे नमुने ‘पॉझिटीव्ह’

By admin | Published: January 28, 2016 12:08 AM2016-01-28T00:08:24+5:302016-01-28T00:14:04+5:30

केर गावातील माकडताप : राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त

Samples of 18 patients are positive | १८ रुग्णांचे नमुने ‘पॉझिटीव्ह’

१८ रुग्णांचे नमुने ‘पॉझिटीव्ह’

Next

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील केर गावात उद्भवलेल्या कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (माकडताप) या आजारांची लागण झालेल्या रूग्णांच्या रक्त नमुन्याचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून सिंधुदुर्ग आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्यात तब्बल १८ रूग्णांचे रक्त नमुने हे पॉझिटीव्ह आले असल्याची धक्कादायक बाब अहवालाद्वारे उघड झाली आहे. २४ जानेवारी रोजी माकड तापाने केर येथीलच एका तरूणाचा मृत्यू झाला. त्यातच १८ रूग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
कर्नाटक, तामिळनाडू, केरळ पाठोपाठ आता महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील केर गावात माकडतापाने हैदोस घातला आहे. माकडताप हा आजार विषाणूजन्य असून गोचिड चावल्यामुळे हा आजार पसरतो.
मात्र, या तापाचे रूग्ण वाढतच चालल्याने अखेर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य यंंत्रणेमार्फत केर गावात आवश्यक ती उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. त्यातच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या एका टिमला केर गावात पाचारण करून संशयित रग्णांचे रक्त नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार या संस्थेने ३० रूग्णांचे नमुने घेत त्यावर पुणे येथे रिसर्च केले. या संस्थेचा अहवाल बुधवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला असून यात १८ रूग्णांना माकडतापाच्या विषाणूची लागण झाल्याचे त्या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, माकडताप साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. व्ही. सोडल यांना विचारले असता ते म्हणाले, पुणे येथील संस्थेचा अहवाल प्राप्त झाला असून यात १८ जणांचे रक्त नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. केर गावात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते औषधोपचाराखाली आहेत.(प्रतिनिधी)


ंआज कार्यशाळा : आरोग्य यंत्रणेची धावपळ
वैभववाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीपट्ट्यालगत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘माकडतापाचे रूग्ण कसे हाताळावेत’ कोणती उपाययोजना करावी, कोणत्याप्रकारे जनजागृती करावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग ओरोस येथे या कर्मचाऱ्यांना गुरूवारी सकाळी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ. एन. व्ही. सोडल यांनी दिली आहे.
लेप्टो, स्वाईन फ्लू या तापाने जिल्ह्यात कित्येक जणांचे बळी गेले. या तापावर रिसर्च करून त्याला प्रतिबंध करता येईल असे औषध शोधून काढले. तापाला जिल्ह्यातून पळवून लावले. मात्र, आता केर गावात माकडतापाची साथ आल्याने आरोग्य यंत्रणा चक्रावली आहे. रविवारी येथीलच एका तरूणाचा या साथीच्या आजाराने मृत्यू झाला. त्यातच १८ रूग्णांचे रक्त नमुने पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. या साथीला नामशेष करण्याचे आव्हान आता आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.

Web Title: Samples of 18 patients are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.