कणकवली तालुक्यातील जानवली पुलालगत दोन्ही बाजूने पादचारी पुलांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:16 PM2022-02-17T14:16:46+5:302022-02-17T14:17:02+5:30
कणकवली: मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अनेक नवीन पुलांची निर्मिती झाल्यानंतर आता कणकवली तालुक्यातील जानवली नदीलगत असलेल्या पादचारी पुलालाही मंजुरी ...
कणकवली: मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अनेक नवीन पुलांची निर्मिती झाल्यानंतर आता कणकवली तालुक्यातील जानवली नदीलगत असलेल्या पादचारी पुलालाही मंजुरी मिळाली आहे. या पादचारी पुलांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच ठेकेदार निश्चित होणार आहे. या पुलांकरिता २८ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.
जानवली नदीवर असलेल्या महामार्गाच्या चौपदरी रस्त्याच्या पुलाच्या दोन्ही बाजूला हे पादचारी पूल होणार आहेत. त्यामुळे जानवली पुलावर महामार्गाला जोडणारे सर्व्हीस रस्ते हे या पादचारी पूलांना जोडले जाणार आहेत. ८२ मिटर लांबीचा एक असे दोन पादचारी पूल या ठिकाणी कार्यान्वित होणार आहेत.
या दोन्ही पादचारी पुलांची निविदा प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून पुढील एक महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ पातळीवरच्या सूत्रांकडून देण्यात आली. तसेच ८० मीटर लांबी व प्रत्येकी ११ मीटर रुंदी असलेले हे पादचारी पूल कलमठ गावासह जानवली गावाला जोडणाऱ्या सर्व्हीस रस्त्यांना रहदारीच्या दृष्टीने ही फायदेशीर ठरणार आहेत.
तसेच या दोन्ही बाजूला होणाऱ्या पादचारी पुलाना कणकवली शहरातून येणारा व कणकवली शहराकडे जाणारा सर्व्हीस रोड जोडला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबतची महामार्ग प्राधिकरण कडून माहिती दिली गेली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या कोविडच्या संकटामुळे हे काम प्रलंबित राहिले होते.
मात्र आता काही महिन्यात या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होण्याचा मार्ग काम मंजुरीमुळे मोकळा झाला आहे. याच सोबत कणकवली शहरातील उड्डाणपुलाला जोडणारा बॉक्सेल ब्रिजचा वारंवार कोसळणारा भाग काढून तो भाग पुन्हा नव्याने करण्याबाबत ठेकेदार कंपनीला सूचना देण्यात आल्याचेही महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
वारंवार उड्डाणपुलाला जोडणारा बॉक्सेल ब्रिज कोसळणे किंवा खचण्याचे प्रकार होत असल्याने या बॉक्सेल ब्रिजच्या वरील रस्त्याच्या भागात सिमेंटची बॅरिकेट लावून ठेवण्यात आली आहेत. मात्र, पावसाळ्यानंतर ही बॅरिकेट अद्याप दूर न करता अद्यापही जैसे थे स्थितीत आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल. व बॉक्सेल ब्रिजचा कोसळणारा भाग काढून ते काम नव्याने करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. असे महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कणकवलीतील उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्सेल ब्रिजच्या खचलेल्या व कोसळणाऱ्या भागाच्या दुरुस्तीसह महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत प्रलंबित असणारी अन्य कामे देखील करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.