वाळू उत्खननाच्या निविदा भरणार नाही!वाळू व्यावसायिकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:15 PM2020-12-24T20:15:11+5:302020-12-24T20:16:49+5:30
sand Sindhudurgnews- शासनाने प्रति ब्रास वाळूचा दर वाढवून २ हजार ११४ रुपये केल्याने वाळू व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वाळू व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे वाळू दर कमी करण्याची मागणी केली जाणार आहे. असहकार म्हणून आम्ही वाळू उत्खननाची कोणतीही निविदा भरणार नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्यावतीने काका कुडाळकर व बाबा परब यांनी मांडली.
मालवण : शासनाने प्रति ब्रास वाळूचा दर वाढवून २ हजार ११४ रुपये केल्याने वाळू व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वाळू व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे वाळू दर कमी करण्याची मागणी केली जाणार आहे. असहकार म्हणून आम्ही वाळू उत्खननाची कोणतीही निविदा भरणार नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्यावतीने काका कुडाळकर व बाबा परब यांनी मांडली.
वाळू दरवाढीच्या विरोधात चर्चा करण्यासाठी व्यावसायिकांची बैठक मालवण चिवला बीच येथील हॉटेल सिल्वर सँड येथे पार पडली.
यावेळी संतोष गावकर, श्याम वाक्कर, राजन बोभाटे, प्रवीण खोत, बाबू तोरसकर, संदेश पवार, भाऊ हडकर, वीरेंद्र भिसळे, सिद्धेश परब, घन:श्याम प्रभू, प्रकाश मेस्त्री, संदेश मटकर, प्रसाद वालावलकर, चिन्मय चिंदरकर, संदेश वेतुरेकर, संतोष चिपकर, योगेश नाईक, तानाजी माडये, विराज वस्त, प्रकाश तोंडवळकर, सिद्धार्थ तोंडवळकर, आशिष शेलटकर, मनमोहन डिचोलकर, साईनाथ माडये, नाईक आदी उपस्थित होते. शासन अशाप्रकारे वाळू व्यावसायिकांची गळचेपी करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
११०० रुपये दर पाहिजे : कुडाळकर
काका कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्गात स्थानिकांना रोजगार मिळावा या शासन धोरणानुसार हातपाटीने वाळू काढली जाते. ३०० रुपये दराप्रमाणे नियमित १५ टक्के वाढ झाली असती, तर आज वाळूदर १२०० रुपयांपर्यंत आला असता. मात्र, शासनाने दोन वेळा दरात अचानक वाढ करीत आज २१०० रुपये दर केला आहे. वाळूदर वाढल्यास छोटे व्यावसायिक बाजूला होऊन धनदांडगे एकत्र येऊन व्यवसाय करतील. म्हणूनच प्रति ब्रास वाळूचा दर ११०० रुपये इतका निश्चित झाला पाहिजे.
ग्राहकांना वाळू कोणत्या दराने द्यायची? : परब
बाबा परब म्हणाले, वाळू दर आणि दोन ब्राससाठी काढावा लागणारा पासचा खर्च, तसेच कामगारांचे प्रतिब्रास वेतन यांचा हिशेब घातला असता वाळूचा बाजारभाव दहा हजारांच्या वर पोहोचतो. त्यामुळे ग्राहकांनाही वाळू कोणत्या किमतीने द्यायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे १ हजार ४८४ रुपये प्रति ब्रास हा दर प्रस्तावित केला होता. हाही दर आम्हांला मान्य नाही. वाळू दराबाबत दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे.