सावरकर गौरवयात्रा काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम, संदेश पारकरांची नितेश राणेंवर टीका
By सुधीर राणे | Published: April 4, 2023 02:16 PM2023-04-04T14:16:17+5:302023-04-04T14:16:50+5:30
वीर सावरकरांचे व्यक्तिमत्व लज्जास्पद म्हणणारे, वीर पुरुषांचा अपमान करणारेच आता गौरवयात्रा काढत आहेत
कणकवली: काही व्यक्तीनी भारतीय जनता पार्टीला आयुष्यभर शिव्या दिल्या आणि वीर सावरकरांचा सतत अपमानच केला. तर आता सावरकर यांची गौरवयात्रा काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम आमदार नितेश राणे करत आहेत अशी टीका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्याकडे कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून संदेश पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार नितेश राणे हे स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये गेल्यानंतर वीर सावरकरांच्या नावाने आता जिल्ह्यामध्ये गौरवयात्रा काढत आहेत. त्यानी यापूर्वी वीर सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवले होते.
वीर सावरकरांचे व्यक्तिमत्व लज्जास्पद म्हणणारे, वीर पुरुषांचा अपमान करणारेच आता गौरवयात्रा काढत आहेत, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. राणे यांच्या रंग बदलण्याच्या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यातील मूळ भाजप आणि जनता राणे यांच्या नेतृत्वावर कधीही विश्वास ठेवणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता खुळी नाही. ज्या पद्धतीने राणे राजकारणामध्ये काम करीत आहेत त्याला जनतेचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी कितीही गौरवयात्रा काढण्याचा प्रयत्न केला तरी ती गौरवयात्रा नसून ती सावरकरांची अपमान यात्राच असेल. भाजपचे हे नेतृत्व लोकांना वेठीस धरणारे नेतृत्व आहे अशी टीका संदेश पारकर यांनी केली.