पाण्यासाठी रक्त सांडू !
By Admin | Published: April 7, 2017 12:16 AM2017-04-07T00:16:10+5:302017-04-07T00:16:10+5:30
कांदळगाव ग्रामस्थ; सर्जेकोट-मिर्याबांदला पाणी नाही
मालवण : कांदळगाव गाव तहानलेला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी मिळत नसतानाही दुसऱ्या गावाला कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा करू देणार नाही. २०१० साली ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यानंतर योजना बासनात गुंडाळण्याची कार्यवाही शासनाकडून वरवर करण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध व ग्रामसभेचा ठराव झुगारून जबरदस्तीने नळपाणी योजनेचे काम सुरु केले, तर पाण्याच्या थेंबासाठी रक्त सांडू, पण गावातून पाण्याचा एकही थेंब दुसऱ्या गावाला देणार नाही, असा इशारा ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला.
कांदळगाव गावाची विशेष ग्रामसभा येथील प्राथमिक शाळेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी उमेश कोदे, सरपंच बाबू राणे, जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे, माजी सरपंच उमदी परब, निकिता कदम, वैभव राणे, भाग्यश्री डिचोलकर, ग्रामसेवक ए. बी. पेढे यांच्यासह राजेंद्र कोदे, राजेंद्र कदम, विकास आचरेकर, राजन लाड आदी ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
सभेत कांदळगावचे पाणी सर्जेकोट मिर्याबांद गावाला देण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेला कांदळगाव ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून योजना साकारण्यास आल्यास न्यायालयीन लढा लढण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामसभेच्या निर्णयाच्या प्रती आमदार, खासदार, जलसंपदामंत्री, पाणीपुरवठामंत्री यांना पाठविण्यात याव्यात, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.