वैभववाडी नगरपंचायतीत ‘मशाल’ विझली, उद्धवसेनेच्या एकमेव नगरसेविकेने हाती घेतले ‘कमळ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:55 IST2025-01-27T11:53:50+5:302025-01-27T11:55:45+5:30
वैभववाडी : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीतील उद्धवसेनेच्या एकमेव शिल्लक राहिलेल्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे यांनी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी मत्स्य ...

वैभववाडी नगरपंचायतीत ‘मशाल’ विझली, उद्धवसेनेच्या एकमेव नगरसेविकेने हाती घेतले ‘कमळ’
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील उद्धवसेनेच्या एकमेव शिल्लक राहिलेल्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे यांनी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे नगरपंचायतीतून मशाल पुरती विझली असून, स्वीकृत नगरसेवक मनोज (बंडू) सावंत यांच्या रूपाने उद्धवसेनेचे नाममात्र अस्तित्व उरले आहे.
विधानसभेच्या निकालानंतर तालुक्यात उद्धवसेनेला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. महिनाभरात उद्धवसेनेचे नगरसेवक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केले आहेत. तर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत निवडून आलेल्या उद्धवसेनेच्या पाच नगरसेवकांपैकी नगरसेवक प्रदीप रावराणे, श्रद्धा रावराणे, दर्शना पवार व अपक्ष नगरसेवक सुभाष रावराणे यांनी भाजपात प्रवेश केला.
त्यानंतर शहर शहरप्रमुख शिवाजी राणे यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला. नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांना नामोहरण करणारे उद्धवसेनेचे नगरसेवक रणजित तावडे यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला. त्यांना बांधकाम सभापतिपदाची लॉटरी लागली. त्यानंतर उद्धवसेनेच्या सानिका सुनील रावराणे या एकमेव नगरसेविका नगरपंचायतीत होत्या.
आता रावराणेंनीही नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवली येथे ‘कमळ’ हाती घेतल्याने नगरपंचायतीतील उद्धवसेनेची मशाल विझली आहे. त्यांच्यासोबत सहकारी संस्थेचे अध्यक्ष संतोष (बाबा) मांजरेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, सुनील रावराणे, दीपक माईणकर आदी उपस्थित होते.
उद्धवसेनेचे अनेक जण भाजपच्या उंबरठ्यावर
उद्धवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे पक्ष संघटनेकडे असलेले दुर्लक्ष आणि अंतर्गत वादामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही मातोश्रीच्या जवळचा कोणीही पदाधिकारी संघटनेकडे लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तर अजूनही काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी तालुक्यात उद्धवसेनेला घरघर लागलेली पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.