संजय राऊत हे राष्ट्रवादीची 'वाय झेड' टीम, नितेश राणेंची टीका
By सुधीर राणे | Published: June 28, 2023 01:55 PM2023-06-28T13:55:25+5:302023-06-28T13:57:17+5:30
'तुरुंगात कविता, शायरी म्हणत दिवस काढावे लागतील'
कणकवली: संजय राऊत हे कायम ज्ञान पाजळत असतात. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राऊत टीका करत असतील तर ती आम्ही सहन करणार नाही. के.सी.आर. ही भाजपाची 'बी टीम' म्हणणारे राऊत हे राष्ट्रवादी पक्षाचे 'वाय झेड' टीम आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे बुधवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून केसीआर यांच्या सोबत जे नेते गेले आहेत, त्याचे दुःख राऊत यांना झाले आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच केसीआर यांनी हे केले, ते केले अशी टीका ते करत आहेत. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात त्यांचा पक्ष व पक्षप्रमुख संपत चालले आहेत. याची थोडी तरी चिंता संजय राऊत यांनी करावी.
तुरुंगात कविता, शायरी म्हणत दिवस काढावे लागतील
राऊत यांच्या जामीनावरच ईडी विभागाची हरकत आहे. भाजप -शिवसेना युतीचे सरकार पडणार अशी स्वप्ने पाहणारे राऊत यांना आमचे सरकार पाडता आलेले नाही .मात्र, यापुढे त्यांना तुरुंगाच्या अंधार कोठडीत कविता आणि शायरी म्हणत दिवस काढावे लागतील.
विनायक राऊतांनी दहा कामे दाखवावीत
तर आमच्यावर टीका करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी केलेली कोणतीही दहा कामे दाखवावीत. तसेच केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी विकासाबद्दल बोलावे. असेही नितेश राणे म्हणाले.