संजू परब यांचे राणेंवर बेगडी प्रेम :रुपेश राऊळ, साक्षीदार असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:17 IST2021-02-16T18:15:39+5:302021-02-16T18:17:38+5:30
Narayan Rane Sindhudurgnews- संजू परब यांंनी शिवसेनेत प्रवेश करताना खासदार विनायक राऊत यांच्या घरी राणेंची जंत्री वाचली होती. त्याचा प्रमुख साक्षीदार मी स्वत: असून, वेळ पडल्यास आम्ही हे उघड करू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे. राणेंवर बेगडी प्रेम करणारे परब हे खरे नौटंकीबाज आहेत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

संजू परब यांचे राणेंवर बेगडी प्रेम :रुपेश राऊळ, साक्षीदार असल्याचा दावा
सावंतवाडी : राणेंना कोणीही काही म्हटले तरी यापुढे खपवून घेतले जाणार नाही असे सांंगणाऱ्या सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांंनी शिवसेनेत प्रवेश करताना खासदार विनायक राऊत यांच्या घरी राणेंची जंत्री वाचली होती. त्याचा प्रमुख साक्षीदार मी स्वत: असून, वेळ पडल्यास आम्ही हे उघड करू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे. राणेंवर बेगडी प्रेम करणारे परब हे खरे नौटंकीबाज आहेत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, राघोजी सावंत, अशोक दळवी, सुरेंद्र बांदेकर, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.
राऊळ म्हणाले, राजन तेली यांनी शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय चालले आहे ते प्रथम पहावे. नंतर आमच्यावर टीका करावी. सावंतवाडी नगराध्यक्षांच्या खुर्चीबद्दल एक आदर होता तो परब घालवून बसले आहेत. सावंतवाडीत कधीही हाणामारीची भाषा झाली नाही. पण ती परब यांनी केली. जर तुम्हांला पुतळाच जाळायचा होता तर गांधी चौकात जाळायचा. सालईवाडा येथे कशाला गेला? असा सवालही राऊळ यांनी केला आहे.
परब हे माझी नेमळे आणि मळगाव ग्रामपंचायत गेली असे सांगत आहेत. पण त्यांच्याकडे तळवडे तसेच इन्सुलीची जबाबदारी दिली होती. ते निरीक्षक होते. मग या दोन्ही ग्रामपंचायतीत भाजपचा पराभव का झाला असा सवालही राऊळ यांनी केला आहे. आम्ही नक्की पराभवाचे आत्मपरीक्षण करू, असेही यावेळी राऊळ म्हणाले.
तर जंत्रीच वाचून दाखवू
ज्या व्यक्तीच्या पायाला हात लावला त्याचाच पुतळा जाळण्यासाठी जाता म्हणजे तुमच्यावर कोणते संस्कार झाले हे आम्हांला कळते. परब हे जर राणेंवर कुणीही काही बोलले तर सोडणार नाही अशी भाषा वापरतात. पण याच परब यांनी खासदार राऊत यांच्या घरी जाऊन राणेंची जंत्री वाचली होती. त्यावेळी त्यांचे राणेंवर असलेले बेगडी प्रेम कुठे गेले होते? परब हे नौटंकीबाज आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. जर ते यापुढे शिवसेनेवर अशीच टीका करीत राहिले तर सर्व जंत्रीच वाचून दाखवू, असा इशाराही राऊळ यांनी दिला.