संतोष परब हल्ला प्रकरण : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंतांना दोन दिवसाची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:27 PM2022-02-14T16:27:15+5:302022-02-14T16:27:47+5:30
कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना न्यायालयाने दोन दिवसाची ...
कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कणकवली दिवाणी न्यायाधीश सलीम जमादार यांनी सावंत यांना १६ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कणकवली न्यायालयासमोर शरण आले. त्यानंतर त्यांना दुपारी कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच अजून पोलीस तपास करायचा आहे. यासह अन्य मुद्दे उपस्थित करत सावंत यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
तर गोट्या सावंत यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला. यावेळी या गुन्ह्यातील बहुतांशी तपास पूर्ण झाला आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलीस तपासात गोट्या सावंत यांचा सहभाग निष्पन्न झालेला नाही.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने हा आरोप करण्यात आला होता. असा युक्तिवाद ॲड. रावराणे यांनी केला. यावेळी संतोष परब हल्ल्या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर देखील उपस्थित होते.
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कणकवली दिवाणी न्यायाधीश सलीम जमादार यांनी संदेश सावंत यांना १६ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली.