संतोष परब हल्लाप्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने संदेश सावंतांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:25 PM2022-02-07T14:25:38+5:302022-02-07T14:26:44+5:30
संतोष परब हल्ला प्रकरणात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे संशयित आरोपी आहेत.
कणकवली: शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या श्रीधर सावंत यांनी अर्ज दाखल केला होता. हा अटकपूर्व जामीन अर्ज आज, सोमवारी न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच दहा दिवसांत ट्रायल कोर्टात शरण जावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती वकील राजेंद्र रावराणे यांनी दिली.
संतोष परब हल्ला प्रकरणात संदेश सावंत हे संशयित आरोपी आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज वकिलांमार्फत दाखल केला होता. सुनावणी नंतर ते अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सोमवारी सुनावणी झाली.
या सुनावणीत वकील राजेंद्र रावराणे ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या सुनावणीत सरकारी पक्ष व आरोपींच्यावतीनेही बाजू मांडण्यात आली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. तर, सावंत यांना दहा दिवस पोलिसांना अटक करता येणार नाही. मात्र, त्यांनी ट्रायल कोर्टात शरण जावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. असे वकील राजेंद्र रावराणे यांनी सांगितले.