अॅडमिरलऐवजी सरखेल, कमांडर ऐवजी सरनौबत..?; नौदलातील पदांची नावे भारतीय परंपरेनुसार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:18 PM2023-12-08T12:18:27+5:302023-12-08T12:18:55+5:30
संदीप बोडवे मालवण: भारतातील पहिल्या मराठा आरमाराचे प्रमुख असलेल्या कान्होजी आंग्रे यांचे आरमारीतील सरखेल हे पद आता अॅडमिरल ऐवजी ...
संदीप बोडवे
मालवण: भारतातील पहिल्या मराठा आरमाराचे प्रमुख असलेल्या कान्होजी आंग्रे यांचे आरमारीतील सरखेल हे पद आता अॅडमिरल ऐवजी वापरले जाण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमातील अन्य अधिकारीक पदांची नावे सुध्दा भारतीय नौदलाच्या अधिकारीक पदांना मिळणार आहेत.
या नावांबाबत नौदला कडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरीही तर्क विर्तकांना उधाण आले आहे. नुकत्याच तारकर्ली येथे संपन्न झालेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घोषणा केली. यावरून आता अंदाज लढविले जाऊ लागले आहेत.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे मार्गक्रमण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. नौदल अधिकार्यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील. नवीन मानचिन्ह नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. अशी ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगत पंतप्रधानांनी घोषणा केली.
मराठा नौदलातील अधिकारीक पदे..
मराठा नौदलात नौदल प्रमुख म्हणून सरखेल हे पद प्रसिद्ध होते. त्याच्या खालोखाल सरनौबत, दर्यासारंग, दर्या विर, दर्यावर्दी, सुभेदार, सारंग, तांडेल, खलाशी, अशीही आरमारात अनेक पदे होती.