मालवणातील सरपंच, ग्रामसेवकांची विकासाभिमुख कामगिरीचे कौतुक : पाताडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:31 IST2020-12-23T18:30:30+5:302020-12-23T18:31:51+5:30
Sarpanch Sindhudurg- गावातील सरपंच आणि ग्रामसेवक ही गावाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. मालवण तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक चांगले काम करीत असून विकासाभिमुख कामगिरीने त्यांनी जिल्ह्यात मालवण तालुक्याला आदर्शवत बनविले आहे. जिल्ह्यातील ही कामगिरी अशीच आदर्शवत रहावी, असे प्रतिपादन मालवणचे पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.

सरपंच, ग्रामसेवक यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती अजिंक्य पाताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
मालवण : गावातील सरपंच आणि ग्रामसेवक ही गावाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. मालवण तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक चांगले काम करीत असून विकासाभिमुख कामगिरीने त्यांनी जिल्ह्यात मालवण तालुक्याला आदर्शवत बनविले आहे. जिल्ह्यातील ही कामगिरी अशीच आदर्शवत रहावी, असे प्रतिपादन मालवणचे पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती मालवणच्यावतीने मालवण तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व महात्मा गांधी आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, माजी सभापती मनीषा वराडकर, प्रशिक्षक व कणकवली पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, पंढरीनाथ माणगावकर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव व इतर उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर हर्षदा वाळके व पंढरी माणगावकर यांनी १५ व्या वित्त आयोगाबाबत व अन्य विविध विषयांबाबत विस्तृत माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले.
मार्गदर्शन काळाची गरज
गावाचा कारभार हाकणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांना बदलत्या वित्त आयोगाबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे. विकासकामांसाठी निधी खर्च करताना अनेक अडचणी येतात. १५ व्या वित्त आयोगाचा अभ्यास, त्यातील नियम व अटी सरपंच व ग्रामसेवक यांनी जाणून घ्याव्यात. त्यानुसार गावाच्या विकासासाठी निधी योग्य प्रकारे खर्च करून गावाचा विकास साधावा. गावाच्या विकासात सरपंच व ग्रामसेवक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे परुळेकर यांनी सांगितले.