दोडामार्ग तालुक्यात सरपंच निवड शांततेत

By admin | Published: August 4, 2015 11:53 PM2015-08-04T23:53:37+5:302015-08-04T23:53:37+5:30

तेरवण-मेढेत काँग्रेसची पिछेहाट : कुडासे, आयनोडे-हेवाळे बिनविरोध

Sarpanch selection in Dodamarg taluka, in peace | दोडामार्ग तालुक्यात सरपंच निवड शांततेत

दोडामार्ग तालुक्यात सरपंच निवड शांततेत

Next

कसई दोडामार्ग : तालुक्यातील तेरवण-मेढे ,आयनोडे-हेवाळे व कुडासे या तीन ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली. यामध्ये अनेक वर्षाची काँग्रेसची सत्ता मोडून काढत तेरवण-मेढे ग्रामपंचायतीवर गाव विकास पॅनेलने बाजी मारली. येथे प्रज्ञा प्रदीप नाईक यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी प्रवीण नारायण गवस यांची बहुमताने निवड झाली. आयनोडे-हेवाळे ग्रामंपचायतीवर संदीप देसाई यांची उपसरपंचपदी तर कुडासे ग्रामपंचायत पूजा पांडुरंग देसाई यांची सरपंचपदी व उपसरपंचपदी प्रसाद दत्ताराम कुडासकर यांची बिनविरोध निवड झाली. एकंदरीत दोडामार्ग तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतींच्या निवडी शांततेत पार पडल्या.
काँग्रेसची प्रतिष्ठेची ठरलेल्या तेरवण-मेढे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून होते. गेली कित्येक वर्षे या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने सत्ता कायम ठेवली होती. यावेळीही काँगे्रसची सत्ता या ग्रामपंचायतीवर प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली होती. या ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ सदस्यांपैकी केवळ चार सदस्य काँगे्रसकडे, तर पाच सदस्य हे गाव विकास पॅनेलकडे होते. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने प्रयत्न केले. मात्र, गावविकास पॅनेलच्या उमेदवार शेवटपर्यंत एकत्र राहिले. सरपंचपदासाठी गावविकास पॅनेलमधून प्रज्ञा प्रदीप नाईक, तर काँग्रेस पुरस्कृत पॅनेलमधून संजना संदीप कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी निवडणूक अधिकारी जी. आर. लोढे यांनी नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी गावविकास पॅनेलचे पूजा प्रदीप नाईक, प्रवीण नारायण गवससह नमिता नामदेव गवस, सुप्रिया नारायण गवस, सगुण सखाराम गवस, तर काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे संजना संदीप कोरगावकर यांच्यासह माला गवस, पार्वती कांबळे आदी उपस्थित होते. यापैकी तुकाराम गवस हे अनुपस्थित राहिले होते. यात प्रज्ञा नाईक यांना पाच, तर संजना कोरगावकर यांना तीन अशी मते मिळाली. त्यामुळे प्रज्ञा नाईक सरपंचपदी विराजमान झाल्या. त्या शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रदीप नाईक यांच्या पत्नी आहेत.
तेरवण-मेढे ग्रामपंचायत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रदीप नाईक, ग्रामस्थ शंकर केसरकर, यशवंत गवस, लिंगाजी गवस, भैरू नाईक, दत्ताराम माळकर, नारायण पंडित, विठ्ठल घाडी, उत्तम दळवी, तुकाराम दळवी, विश्वनाथ गवस, सोमा दळवी, विठ्ठल कदम, अरुण कदम, चंद्रकांत कदम, सातू गवस, शिवराम गवस, कृष्णा गवाळकर, दत्ताराम नाईक तसेच माजी उपसरपंच संदीप कोरगावकर उपस्थित होते.
कुडासे ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदाची बिनविरोध निवड झाली असून, पूजा पांडुरंग देसाई यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी प्रसाद दत्ताराम कुडासकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी काँगे्रसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, पंचायत समिती सदस्य जनार्दन गोरे आदी काँगे्रसचे पदाधिकारी उपस्थित होते. या ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी ही ग्रामपंचायत काँग्रेसकडे असल्याचा दावा केला. तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी ही ग्रामपंचायत गाव विकास पॅनेलकडे असून, गावच्या विकासासाठी राजकारण न करता गाव पॅनेलला पाठिंबा दिल्याचे धुरी यांनी स्पष्ट केले.
आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच पदासाठीची निवडणूक बिनविरोध झाली. या ग्रामपंचायतीत सरपंचपद हे मागास प्रवर्गासाठी राखीव होते. मात्र, या प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले असून, उपसरपंचपदी संदीप देसाई यांची निवडही बिनविरोध झाली आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी ही ग्रामपंचायत काँग्रेसकडे असल्याचा दावा केला आहे. यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sarpanch selection in Dodamarg taluka, in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.