सरपंचांना तत्काळ कोरोना लस द्यावी : राजेंद्र म्हापसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 06:45 PM2021-03-11T18:45:59+5:302021-03-11T18:47:44+5:30
कोरोना कालावधीत गाव पातळीवर आपला जीव धोक्यात घालून सरपंचांनी विशेष काम केले आहे. तसेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सरपंचांना तत्काळ Corona vaccine Sindhudurgnews- कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी आरोग्य समिती सभेत करण्यात आली. तशा सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिल्या. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती तथा प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात केली.
ओरोस : कोरोना कालावधीत गाव पातळीवर आपला जीव धोक्यात घालून सरपंचांनी विशेष काम केले आहे. तसेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सरपंचांना तत्काळ कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी आरोग्य समिती सभेत करण्यात आली. तशा सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिल्या. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती तथा प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात केली.
यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, समिती सदस्य प्रितेश राऊळ, लॉरेन्स मान्येकर, उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केले असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
यावेळी लसीकरण करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित जागा आणि आवश्यक कर्मचारी आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असतील तर लसीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, असा ठराव सभेत घेण्यात आला.
ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांचे मोठे योगदान
कोरोना काळात सर्व सरपंचांसह ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी आपले जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यानंतर प्राधान्याने सर्व सरपंचांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्या. त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा दलाच्या सर्व सदस्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने द्या, अशा सूचना सभापती म्हापसेकर यांनी केल्या.