सरपंचाच्या घरावर बहिष्कार
By admin | Published: December 15, 2014 10:18 PM2014-12-15T22:18:38+5:302014-12-16T00:14:03+5:30
मतदान केल्याचा राग : केळुस कालवीवाडी येथील घटना
वेंगुर्ले : मागील विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केले, या रागातून कालवीवाडीतील ग्रामस्थांनी घरावर बहिष्कार टाकला असल्याची तक्रार केळूस सरपंच करिश्मा खवणेकर व पत्रकार कृष्णा खवणेकर यांनी निवती पोलीस ठाण्यात केली आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी कालवीवाडीतील मच्छिमार ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपला भाऊ, भावजय व वडील यांनी ग्रामस्थांच्या भीतीपोटी मतदान केले नाही. मात्र, आपण पत्रकार असल्याने व पत्नी करिश्मा ही केळूस गावची प्रथम नागरिक असल्याने आम्ही दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचा राग आल्याने कालवीवाडीतील ग्रामस्थांनी २१ आॅक्टोबर रोजी सभा घेतली. या सभेत माझा भाऊ विद्याधर खवणेकर यास बोलावून गणाधीश केळूसकर यांनी धमकावले. तुझ्या भाऊ व भावजय यांनी मतदान केल्याने आजपासून तुमच्याकडे कोणत्याही कार्यक्रमास मच्छिमार समाजातील कोणीही येणार नसल्याचे सांगून घरावर बहिष्कार टाकला.
त्यानंतरही गावातील काही लोक आमच्याकडे येत जात होते. त्या रागातून बाबुराव ताम्हणकर, महेश राऊळ, गोविंद केळूसकर, सुदाम राऊळ, केशव ताम्हणकर, कृष्णा राऊळ यांनी मच्छिमार बांधवांना भडकावून पुन्हा ५ डिसेंबर रोजी बैठक घेतली. या बैठकीस आपणासही बोलाविण्यात आले होते. त्यावेळी तू मतदान केलेस म्हणजे काय, असे आपणास धमकावण्यास आले. त्यावेळी आपण वस्तुस्थिती कथन केली असता, पत्रकाराने मतदान केलेच पाहिजे असा शासननिर्णय आहे का, असल्यास तो दाखव. तरच आम्ही तुझ्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेऊ, असेही सांगितले. वाडीतील लोकांच्या दबावाखाली बळी पडून मच्छिमार समाजाने संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरील व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)