Sindhudurg News: घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, सातारच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 05:48 PM2023-02-14T17:48:24+5:302023-02-14T17:49:11+5:30
मृत महेशच्या शर्टच्या खिशात सापडली चिठ्ठी
वैभववाडी : व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील सातारच्या एका विद्यार्थ्याने खोलीत लोखंडी हुकाला गळफास घेऊन सोमवार, १३ रोजी आत्महत्या केली. महेश अनिल गाडवे (मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातून जाणाऱ्या नावळे रस्त्यालगतच्या इमारतीत महेश भाड्याने राहत होता. त्याच्या खिशामध्ये पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत ‘आपण घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत नसल्याने हा निर्णय घेत आहे’ असे लिहिलेले आढळले आहे.
महेश गाडवे हा एका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिकत होता. वैभववाडीत मित्रांसमवेत तो भाड्याने राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे मित्र आपापल्या गावी गेल्यामुळे तो खोलीत एकटाच होता. त्याच्या खोलीच्या बाजूच्या खोलीत याच महाविद्यालयातील विद्यार्थी राहतात. सोमवारी त्यांना महेशच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्याला हाक मारूनही कोणताच प्रतिसाद मिळाला न मिळाल्याने अखेर धक्का मारून दरवाजा उघडला. त्यावेळी महेश हा मागील खोलीत लोखंडी हुकाला कापडाने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळला.
याबाबत विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सूरज पाटील, पोलिस नाईक मारुती साखरे, अभिजित मोरे, सूरज पाटील हे घटनास्थळी पोहोचले. लटकलेल्या स्थितीतील महेशला खाली काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे स्वखुशीने आत्महत्या
पोलिसांनी संपूर्ण खोलीची तपासणी केली. त्यावेळी मृत महेशच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी सापडली. यामध्ये त्याने मी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच तो शिकत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांना माहिती दिली आहे. ते वैभववाडीत येण्यासाठी निघाले होते.
शवविच्छेदन कणकवलीत?
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात असलेल्या तिन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सेवा कालावधी संपला आहे. त्यामुळे रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन होऊ शकले नव्हते. अखेर शवविच्छेदनासाठी मृतदेह कणकवलीत नेण्याची वेळ पोलिसांवर आली.