सातेरी जलमंदिर जत्रोत्सव
By admin | Published: July 25, 2016 12:38 AM2016-07-25T00:38:54+5:302016-07-25T00:38:54+5:30
भाविकांची गर्दी : भक्तीमय वातावरण
मालवण: बिळवस येथील नवसाला पावणारी श्री सातेरी जलमंदिरचा वार्षिक आषाढी जत्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार असली तरीही हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यावर्षीपासून देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळपासून ओटी भरणे व नवस बोलणे-फेडणे कार्यक्रम घेण्यात आला होता. तर दुपारी १ वाजता देवीला महाप्रसाद (ताटे) लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुन्हा दर्शन व ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. 'सातेरी देवी नमो नम:' या जयघोषात बिळवस गाव भक्तीरसात भिजून गेले होते.
यात्रोत्सावाची व्याप्ती दरवर्षी वाढत असल्याने देवस्थान ट्रस्ट तसेच बिळवस ग्रामस्थांच्या वतीने चोख नियोजन करण्यात येते. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी रांगातून दर्शनाची सोय होती तसेच प्रथमच भाविकांसाठी वाहने पार्क करण्यासाठी वाहनतळ आखण्यात आला होता. यात्रोत्सवासाठी मालवण एसटी आगराच्यावातीने जादा बसफेरी सोडण्यात आली होती तर मालवण पोलिस व मसुरे दूरक्षेत्र यांच्या सहकार्याने जत्रा सुरळीत पार पडली. गोवा, कर्नाटक, मुंबई तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी सकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती छोटू ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब, शिवाजी परब, मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उपसरपंच राहुल परब, राजेंद्र प्रभुदेसाई, भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, सुधीर साळसकर, बाबू परब यांच्या सह अन्य पदाधिका?्यानी दर्शन घेतले. यावर्षी प्रथमच यात्रेच्या ठिकाणी कॉंग्रस पक्षाचे कार्यालय थाटण्यात आले होते.
मंदिराच्या समोरील मुख्य रस्त्यालगत काही भाग रस्त्याचे रुंदीकरणासाठी हटविण्यात आला आहे. पावसामुळे येथे चिखलमय पाणी मुख्य रस्त्यावर आले होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चिखलमय पाण्यातूनच मंदिराच्या ठिकाणी जावे लागत होते. याबाबत भाविकांच्या गैरसोयी बद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली जात होती. भाविकांना तत्काळ दर्शन घेता यावे चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावेळी देवस्थान ट्रस्टचे शशिकांत पालव, लक्ष्मण पालव, सदानंद पालव, सुर्यकांत पालव यांच्यासह गोपी पालव, संतोष पालव, अमित पालव उपस्थित होते. (प्रतिनिधी)