साटेली-भेडशी कॉजवे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:16 PM2020-06-18T18:16:01+5:302020-06-18T18:21:53+5:30
सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले. बुधवारीही पावसाची संततधार कायम होती. ठिकठिकाणचे नदी-नाले भरून वाहत आहेत. दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील साटेली-भेडशी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवलंबावा लागला. त्यामुळे काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
दोडामार्ग : सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले. बुधवारीही पावसाची संततधार कायम होती. ठिकठिकाणचे नदी-नाले भरून वाहत आहेत. दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील साटेली-भेडशी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवलंबावा लागला. त्यामुळे काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
दोडामार्ग तालुक्यात मंगळवारी पावसाने जोर धरला. पावसाची संततधार बुधवारीही कायम होती. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाने जोर धरल्याने तिलारी-दोडामार्ग महामार्गावरील साटेली-भेडशी येथील नदीवरील कॉजवे पाण्याखाली घेला होता. त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागली. तसेच येळपय नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले.
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावरील रस्त्याच्या कडेचे गटार खुले नसल्याने पाणी थेट रस्त्यावर आले. रस्त्याची अवस्था तलावासारखी झाल्याने वाहने चालविताना मोठा अडथळा निर्माण झाला होता. पावसाने केलेली ही जोरदार सुरुवात पाहता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्यावर्षी अशीच पावसाने सुरुवात केली होती. त्यामुळे तिलारी नदीला पुर येऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. तीच परिस्थिती पुन: उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
विजेचा खेळखंडोबा
जोरदार लागणाऱ्या पावसामुळे अनेक भागात बुधवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात मोबाईल नेटवर्कची समस्यादेखील गंभीर झाली आहे.