साठे साहित्य संमेलन सावंतवाडीत होणे भाग्याच
By admin | Published: January 15, 2015 10:10 PM2015-01-15T22:10:23+5:302015-01-15T23:29:19+5:30
बबन साळगावकर : तयारी अंतिम टप्प्याते
सावंतवाडी : सहावे राज्यव्यापी कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे होत असल्याने सावंतवाडीकरांसाठी ही भाग्याची गोष्ट आहे. संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्रातील सुमारे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यासाठी नगरपरिषदेतर्फे सर्व नगरसेवक या संमेलनाच्या सहकार्यासाठी वेळोवेळी उपस्थित राहणार असल्याचे सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत साळगावकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, हरिहर वाटवे, सुमेधा नाईक, नगरसेविका वैशाली पटेकर, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, क्षिप्रा सावंत, अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षपदी सतीश काळसेकर आहेत. महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, हैदराबाद येथील ख्यातनाम लेखक, कवी, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते असे मिळून सुमारे ४०० ते ५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. सकाळी ८ वाजता केशवसुत कट्टा येथून महाविद्यालयीन मुलांसह दिंडीला प्रारंभ होणार आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी व ग्रंथस्टॉलचे उद्घाटन हरिहर आठलेकर, कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर संमेलनाचे उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) व अध्यक्ष सतीश काळसेकर यांच्या स्वागताध्यक्षपदी नगराध्यक्ष बबन साळगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते २ या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या साहित्याची प्रस्तुतता व समकालीन साहित्याची दिशा यावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. माया पंडित (हैदराबाद), रणधीर शिंदे, नितीन रिंढे, आत्माराम लोमटे (जळगाव), डॉ. सुनील भिसे (वेंगुर्ले), प्रा. उदय रोटे (उल्हासनगर) सहभागी होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत दुसरा परिसंवाद ‘सांस्कृतिक आक्रमकांची सद्दी वाढत चालली आहे का?’ होणार आहे. अध्यक्षस्थानी राजा शिरगुप्पे असून निमंत्रित सचिन परब (गोवा), मुक्ता दाभोळकर (दापोली), श्रीकांत देशमुख (नांदेड), गणेश विसपुते (पुणे), डॉ. शिवाजीराव जवळगेकर (लातूर) यांचा सहभाग आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० शाहिरी जलसा (सादरकर्ते शाहीर सदाशिव निकम, कोल्हापूर आणि शाहीर शितल साठे, मुंबई). ६.३० ते ८.३० या वेळेत निमत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. १८ जानेवारी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘राजकारण व समाजकारणाच्या कक्षा संकुचित होत चालल्या आहेत काय?’ हा परिसंवाद होणार आहे.
संमेलनाचा समारोप १२.३० ते १.३० या वेळेत पालकमंत्री दीपक केसरकर, सतीश काळसेकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. राजन गवस, जयप्रकाश सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात चांगल्याप्रकारे दिल्याबद्दल बी. बी. गायतोंडे, समाजकारण ज्ञानेश देऊलकर, राजकारण व समाजकारण जयानंद मठकर, साहित्यिकांमध्ये हरिहर आठलेकर, शिक्षण क्षेत्रात कल्याणी कांबळी यांचा जीवन गौरव सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच वाचक स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार
आहे. (वार्ताहर)